जामनेर/विशेष प्रतिनिधी
केंद्र आणि राज्य सरकारांनी बाहेरगावी नोकरी-व्यवसायाच्यानिमित्त अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळगावी घरी येण्यास सशर्त परवानगी दिली असून बाहेरच्या लोकांचे जामनेर तालुक्यात येणे सुरू झाले आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर त्याची नोंद ठेवून प्रत्येकाला स्थानिक शाळांमध्ये क्वारंटाईन करत आहेत. जामनेर शहरात मात्र नेमका कोण आला आणि कोठून आला हेच कळेनासे झाले आहे. बाहेरून येणारे कोरोना वाहक नागरिकांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. सोबत त्यांच्या तपासण्याही झाल्या पाहिजे. त्यासाठी आता सुमारे दोन महिन्यांपासून घरात बसून असलेल्या सर्वच नगरसेवकांनी त्यांच्या वार्डात येणार्या बाहेरच्या नागरिकांची माहिती प्रशासनाला पुरविण्यासाठी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे झाले नाही तर निरंक असलेल्या जामनेरातही कोरोना प्रादुर्भाव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी प्रत्येक वार्डाच्या नगरसेवकांची आता खरी कसोटी लागणार आहे. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींचा आदर्श जामनेरातील लोकप्रतिनिधींनी घेऊन सहकार्य करण्याची अपेक्षा तालुका प्रशासनाने केली आहे.
सरकारी धोरणानुसार बाहेर अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळगावी परत पाठविण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. त्यानुसार जामनेर तालुक्यात नागरिकांची आवक सुरू झाली आहे. हे नागरिक कोरोना बाधित (पॉझिटीव्ह) नसल्याचे प्रमाणपत्र दाखवत असले तरीही त्यांना किमान 15 दिवस होम क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने जामनेर शहरातील स्थानिक शाळांचे अधिग्रहण केले आहे. त्यात या नागरिकांना क्वारंटाईन केले जाणे आत्यंतिक गरजेचे आहे.
यासाठी जामनेर शहरातील स्थानिक नागरिकांनी त्यांच्या वार्डातील नव्याने आगमन झालेल्या नागरिकांची नोंद ठेवावी आणि त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाला सूचना करावी, अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. असे झाले नाही तर जामनेर शहर कोरोनाग्रस्त व्हायला वेळ लागणार नाही.
दुकाने उघडे राहू देण्यासाठी
प्रशासनावर राजकीय दबाव!
जामनेर शहरात अद्यापही पाहिजे त्याप्रमाणात लॉकडाऊनचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. अत्त्यावश्यक सेवा वगळून शहरातील इतरही दुकाने उघडली जात आहे. स्थानिक प्रशासन कार्यवाहीसाठी पुढे आले तर राजकीय हस्तक्षेप केालाजात असल्याच्या तक्रारी खुद्द कर्मचार्यांनी केल्याने त्यांची हतबलता दिसून येते. वास्तविक लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होणे काळाची गरज आहे. मात्र जामनेर शहरात बंद असलेली अनेक दुकाने खुलेआमपणाने उघडल्या जात आहे. कर्मचारी वर्गाने कार्यवाहीचे बोलल्यास त्यांना अरेरावी केली जाते, प्रसंगी राजकीय हस्तक्षेप केला जातो. त्यामुळे पोलिस आणि नगरपरिषद प्रशासन त्याठिकाणी कार्यवाही करण्यास धजावत नाही.
जामनेर शहराच्या सुदृढ आरोग्यास अबाधित ठेवण्यासाठी कोणाही राजकीय दबावाला बळी न पडता अशा कायदेभंग करणार्या व्यापारी आणि दुकानदारांवर गुन्हे दाखल करावे, अशी शहरातील सुज्ञ नागरिकांनी केली असून त्यांचे प्रशासनाला सदोदित सहकार्य लाभत असते.