काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाआघाडी अबाधित राहणार!!
प्रदीप गायके/जळगाव
गेल्या 15-20 दिवसांपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. राज्यपालांकडे महाआघाडीने दोनदा मागणी करूनही राज्यपाल सकारात्मक दिसले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि मार्गदर्शनाखाली शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने जालीम उपाय शोधला. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांच्या निवडुका त्वरित घेण्याची मागणी निवडणूक आयोग आणि राज्यपालांकडे केली. निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावाने दिनांक 21 मे रोजी निवडणूका घेण्याचे जाहीर केल्यामुळे कोवीड 19 कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन अवस्थेत असतांना अस्थिरतेचे सावट दूर झाले. महाआघाडीचे सरकार आता पुन्हा एकदा स्थैर्याकडे दमदारपणे वाटचाल करत राहील. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची रणनीती उपयोगात आली.
राज्यात कोरोनाचा दृष्प्रभाव असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय संयमाने त्याला हाताळत आहे. अशाच वेळी नेमके 28 मे पूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोणत्यातरी एका सभागृहाचे सभासदत्व प्राप्त करणे आवश्यक आहे. महाआघाडीने विधान परिषदेवर नियुक्तीसाठी दोनदा प्रयत्न केले. मात्र विरोधपक्ष भाजपाने नियुक्त सभासदाला मंत्री किंवा मुख्यमंत्री करण्यास विरोध केल्यामुळे अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते.
अशा बिकट प्रसंगातून राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. 24 एप्रिलला विधान परिषदेच्या आठ जागा आणि तत्पूर्वी एक अशा नऊ जागा रिक्त होत्या. या रिक्त जागांच्या निवडणुका घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आणि आयोगाने ती मान्य केल्यामुळे 21 तारखेला उध्दव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला.
या विधान सभेच्या सदस्यांकडून क्रमदेय एकमतदान पध्दतीने ही निवडणूक होईल. पक्षीय बलाबल पाहत यावेळी काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेच्या पदरात कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त सहा जागा मिळू शकतील. तर भाजपाला कमीत कमी तीन आणि विधानसभेतील त्यांच्या सहयोगी मित्रपक्षांच्या सहकार्याने जास्तीत जास्त चार जागा मिळू शकतील.
विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला मतांचा कोटा मिळणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र कोरोना संक्रमणकाळात वाटचाल करत असतांना गेल्या 15-20 दिवसांपासून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. आणीबाणी लागू करण्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या. मात्र विधानपरिषदेवर नियुक्त होण्याऐवजी थेट निवडणुकीद्वारे निवड होणार असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठाही वाढीस लागली आहे.
राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न झाल्यावरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अतिशय संयमाने आलेल्या आपत्तीशी सामना करत आहेत. सरकारच्या या कामगिरीचे सर्वच स्थरांवरून कौतुक होत असल्यामुळे भाजपा या विरोधी पक्षाच्या पोटात दुखायला लागले होते, म्हणूनच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची वाटचाल आणीबाणीच्या दिशेने सुरू असल्याचे विधान करून खळबळ निर्माण केली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करणार हे निश्चित असले तरी यापुढे विरोधी पक्ष कोणत्या कार्रवाया करणार हेही लवकरच कळेल. तूर्त महाराष्ट्र सरकारवरील संकट टळले आहे. कोरोनाचेही संकट आता हे सरकार दूर करील यात शंकाच नाही!