बंदी नाही संधी ….. ‘लॉकडाऊन’ मुळे शेतमाल विक्रीचे तंत्र शिकलो, जळगाव जिल्ह्यात कृषि विभागाच्या मार्गदर्शनाने शेतकरी गटांमार्फत 17 हजार क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री, सुमारे 31 कोटी रुपयांची झाली उलाढाल

0

                                                दिनांक – 01 मे, 2020

            कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा काळ हा आमच्यासाठी बंदी नाही तर संधी म्हणून लाभला आहे, कृषि विभागाच्या मार्गदर्शनाने लॉकडाऊनमध्ये आम्ही शेतमाल विकीचे तंत्र शिकलो. अशी उत्सफुर्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पिंपळगांव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव येथील मोसंबी उत्पादक शेतकरी शरद पाटील यांनी…

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढू लागला आणि देशभरात लॉकडाऊन घोषित आला. हा काळ नेमका फळपिकांचा काढणीचा काळ असल्याने हवालदिल झालो होतो. वर्षभर जपलेले पीक मातीमोल होणार या भितीने अंगावर काटाच आला होता. परंतु कृषि विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे आणि आत्माचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकरी ते ग्राहक या उपक्रमातंर्गत जिल्ह्यात 45 लाख रुपयांची 150 टन मोसंबी थेट ग्राहकांना विकता आल्याने होणारे नुकसान तर टळलेच शिवाय ग्राहकांनाही माफक दरात ताजी फळे देता आल्याचे समाधान वेगळेच आहे.

लॉकडाऊनच्या काळात नागरीकांना जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला व फळे यांची कमतरता भासू नये अशा सुचना  जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी याकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. आणि मग जिल्ह्यातील नागरीकांना भाजीपाला व फळे थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषि विभागाने केले. कृषि विभागामार्फत शेतकरी, शेतकरी गट, आत्मा गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी केलेली आहे. भाजी मंडईमध्ये गर्दी होऊ नये तसेच शेतकऱ्यांना सुरक्षितपणे आपला भाजीपाला विकता यावा, यादृष्टीने कृषी विभागाने शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम सुरु केला आहे. याकरीता शेतकरी गटांशी चर्चा करुन शेतातील भाजीपाला, फळे ग्राहकाच्या दारापर्यंत देण्याचे निश्चित करण्यात आले. आणि बघता बघता 27 मार्चपासून आजपर्यंत 883 गटांच्या व उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 17 हजार क्विंटल भाजीपाला व फळांचे वितरण करण्यात आले. यामध्ये 31 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने शेतक-यांना मोठे सहाय्य मिळाले. तर जनतेलाही घरबसल्या योग्य दरात ताजा भाजीपाला मिळाल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले.

या उपक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  14 कोटी 25 लाख रुपयांची 9500 क्विंटल फळे तर  16 कोटी 75 लाख रुपयांचा 7500 क्विंटल भाजीपाला विक्री केला आहे. यामध्ये शिरसोली येथील शेतकरी चंद्रशेखर झुरकाळे यांनी कांदा, उमाळा येथील शेतकरी विजय चौधरी, अनिल खडसे यांनी टरबूज, पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा येथील शेतकरी शरद पाटील व श्रीकांत पाटील यांनी मोसंबी, बावटे येथील शेतकरी कमलेश पाटील यांनी खरबुज, अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर येथील शेतकरी विनोद तराळ यांनी केळी, तर आव्हाणे येथील शेतकरी समाधान पाटील यांनी कलर शिमला मिरची, टोमॅटो, वांगे, भेंडी विक्रीत महत्वाचा वाटा असल्याचे कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.

शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या उपक्रमातून शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत ग्राहकांना थेट त्यांच्या दारात भाजीपाला व फळे पुरवली जात असल्यानें ग्राहकांच्या आवडीनिवडी तसेच मालाची विक्री करताना ग्राहकांशी होणारी चर्चा यामधून आम्ही आमचा शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत केले असे या शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमात अनेक शेतकरी रोज नव्याने सहभागी होत आहे. शेतमाल विकताना गर्दी होऊ नये व फळे भाजीपाला घरपोच मिळावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी या शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची ठिकाणे ठरवून देण्यात आली त्या दृष्टिकोनातून काटेकोर नियोजन केल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

भाजीपाला व फळे विक्रीच्या ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन होणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची पुरेपुर दक्षता घेण्यात आली असून कोरोना संसर्गापासून सरंक्षण करण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माल विक्री करताना तसेच तालुक्यातून गावात येत असताना काय दक्षता घ्यावी, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. यामध्ये सहभागी शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्याही सुचना दिल्यात आहेत.

लॉकडाऊनच्या काळात उमाळा येथील शेतकरी विजय चौधरी, अनिल खडसे यांनी 12 लाख रुपयांच्या  टरबूजांची विक्री केली तर पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा येथील शेतकरी शरद पाटील व श्रीकांत पाटील यांनी 45 लाख रुपयांची मोसंबी, बावटे येथील शेतकरी कमलेश पाटील यांनी 40 लाख रुपयांच्या खरबुज विक्री केल्याने लॉकडाऊन हे आमच्यासाठी बंदी नाही तर संधी म्हणून उपलब्ध झाल्याचे या शेतकऱ्यांनी आनंदाने सांगितले.

विलास बोडके

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here