हर्षद गद्रे, मनमाड प्रतिनिधी- गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण भारतात लोकप्रिय ठरलेली हिंदी धारावाहिक तारक मेहता का उलटा चष्मा मधील शीख व्यक्तीची भूमिका वठवणारे रोषणसिंह सोधी यांनी आपल्या प्रवासात मनमाड शहरात भेट दिली व येथील गुरुद्वारात माथा टेकवला. आपल्या व्यस्त वेळत देखील रस्ते मार्गाने जात असताना मनमाड येथे ते दाखल झाले. मनमाड येथील श्री गुरुगोविंदसिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत उभारलेल्या गुरुद्वारात त्यांनी माथा टेकवला. काही काळ गुरुद्वारात वास्तव्य केले. आलेला प्रत्येक भाविक गुरुद्वारात काही ना काही सेवा करतो त्याच प्रकारे रोशन सिंग यांनीदेखील भाजी चिरण्याची सेवा केली. धारावाहीकेत अत्यंत विनोदी पण आक्रमक भूमिका करणारे सोधी प्रत्यक्ष जीवनात मात्र शांत मनमिळावू व दिलदार स्वभावाचे असल्याचे दिसून आले.गुरुद्वाराच्या वतीने गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीत सिंग यांनी त्यांचा सन्मान केला. रोशन सिंग यांनी देखील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वाराने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.