वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एच-१ बी’ व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-यांना धक्का बसला आहे. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-या भारतीयांची संख्या अतिशय मोठी आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयानं भारताला मोठा फटका बसणार आहे. ट्रम्प यांनी वर्षाच्या अखेरपर्यंत ‘एच-१ बी’ व्हिसा रद्द केला आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प प्रशासनातील अधिका-यांनी सांगितलं आहे.कोरोनाचं संकट आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर उभ्या राहिलेल्या अडचणी यामुळे ‘एच-१ बी’ व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. आर्थिक संकटामुळे नोकरी गमावलेल्या अमेरिकन नागरिकांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेतील व्यापारी संघटना, कायदेतज्ज्ञ, मानवाधिकार संघटना यांनी या निर्णयाबद्दल आक्षेप नोंदवले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत ट्रम्प यांनी ‘एच-१ बी’ व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.‘एच-१ बी’ व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी २४ जूनपासून सुरू होईल. भारतातून मोठ्याा संख्येनं माहिती तंत्रज्ञान अभियंते अमेरिकेत जातात. त्यांना नव्या निर्णयाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांना आता स्टँपिंगच्या आधी किमान वर्षभर प्रतीक्षा करावी लागेल. आपल्या ‘एच-१ बी’ व्हिसाचं नूतनीकरण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभियंत्यांनादेखील या निर्णयाची झळ सोसावी लागेल.अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न पाहणा-या जगभरातल्या २.४ लाख लोकांच्या स्वप्नांना ट्रम्प यांच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी जाणा-या कर्मचा-यांना ‘एच-१ बी’ व्हिसा आवश्यक असतो. एका विशिष्ट कालावधीसाठी हा व्हिसा जारी करण्यात येतो. अमेरिकेतल्या अनेक आयटी कंपन्यांमध्ये भारतीय अभियंते काम करतात. त्यांची संख्या लक्षणीय आहे.