
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या ४५ सैनिकांना कंठस्नान घातल्यानंतरही चीनची खुमखुमी उतरली नसून, त्या देशाने सीमेवर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत लष्कर तैनात करायला सुरुवात केली आहे. भारतानेही लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात हवाई दल व लष्कराचे जवान सज्ज ठेवले असून, चीनने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर द्यायचे ठरविले आहे.
लष्करी पातळीवरील चर्चेबरोबरच चीनने राजनैतिक पातळीवरील चर्चेस तयार असल्याचे म्हटले आहे. भारतही चर्चेसाठी तयार असून, घुसखोरी मागे घ्यावी, ही भारताची अट आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रशिया, चीन व भारत यांच्यात होणा-या व्हर्च्युअल त्रिपक्षीय चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आधी या चर्चेत सहभागी न होण्याचे भारताने ठरविले होते. पण रशियाच्या विनंतीमुळे सहभागी होण्याचे ठरले. चीन व भारत यांच्यात समझोता घडवून आणण्याचा रशियाचा प्रयत्न दिसत आहे.ज्या रानटी पद्धतीने चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला, त्यामुळे भारतात संताप व जगभर नाराजी आहे. भारत, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स पूर्णपणे भारताच्या बाजूने उभे ठाकले आहेत. शिवाय कमांडरसह आपले ४५ सैनिक त्या रात्री ठार झाल्याचे उघड झाल्याने व चिनी नागरिकही सरकारवर अतिशय नाराज आहेत. चीनने अरुणाचल, लडाखच्या सीमेवर लढाऊ विमाने आणली आहेत. भारतीय लष्कर व हवाई दलही तिथे ठाकले आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सोमवारी सर्व विभाग कमांडरांशी याबाबत चर्चा केली.सीमेवर व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर थेट गोळीबार करण्याचे अधिकार भारतीय लष्कराला दिले आहेत. त्यामुळे चीनने भारतीय गोळीबारास उत्तर देण्यास सज्ज आहोत, असा इशारा दिला आहे. चीनची भूमिका काहीसे नमते घेण्याची असल्याची दिसत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून येणारा दबाव आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय बाजारपेठ हातातून जाण्याची भीती यांमुळेच चीन काहीसा नमला असल्याचे दिसते.
