नाशिक : तंत्राच्या उत्पत्तीचं मूळ कारण अजून कुणालाही कळलं नाहीये. तंत्राचा दुरुपयोग होऊ लागला आणि त्याला ‘ काळी विद्या ‘ हे सोयीस्कर नाव पडलं. ही विद्या शिकून करणाऱ्या लोकांची संख्या वाढली तशी याचा वापर करून इस्पित सध्या करुन घेणाऱ्यांची संख्या ही वाढलीच. हे तंत्र पुढे जाऊन लोभाच्या द्वाराची कडी बनले. श्रद्धा – अंधश्रद्धा यात पूर्वपार चालत आलेल्या चकमकीत ही विद्या हेलकावे खात अजूनही जिवंत आहेच. भीतीने हीचा प्रयोग सामान्य माणूस टाळतो. तिच भीती दाखवून ठराविक लोक इतरांची राजरोस लूटही करतात. याला वैज्ञानिक आधार कोणताही नसला तरी अगदीच ‘ नाही ‘ हे ही म्हणता येणार नाही. लोकांना आलेले अनुभव तितकेच दांडगे आहेत.
शववाहिका चालवणारा एक साधा माणूस अनंत , याची कथा ‘ बारदोवी. ‘ चालक म्हणून काम करत असताना अनंत अंत्यविधी नंतर इहलोकात अडकून पडलेल्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी शाबरी तंत्राचा वापर करत असतो. हे काम त्याने सोडलं आहे खरं, पण आपल्या गत आयुष्याच्या काही खुणा त्याला आजही त्रास देतायत. त्याची आई आणि तिच्या अपघाती मृत्यूशी निगडित काही स्वप्न त्याची झोप उडवत असतात. दादू नावाचा त्याचा पालनकर्ता , हा अनंत आणि त्याचा भुतकाळ यातला एकमेव दुवा असतो.
कथा खूप साधी असली तरी ती पटकथेत वळवताना खूप सांभाळून वळवली आहे. एक एक फ्रेम यात महत्त्वाची आहे. एखादी फ्रेम मिस झाली तर पुढचा चित्रपट समजणं अशक्य आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण भागाशी जोडलेली ही कथा , इंच भर सुद्धा खोट्या ग्लॅमर कडे सरकत नाही. ही भयकथा असली तरी उगाच भुतं नाचवून वाटोळं केलेलं नाहीये. गरजेपुरतीच आणि अगदी सचोटीने कात्री फिरवली आहे. पार्श्वसंगीत आणि ध्वनी या चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. भयप्रसंगाना साजेसे संगीत आणि वाद्य वापरतानाही कथा देशातल्या कोणत्या भागात घडते , याचा अंदाज घेऊन ती वापरली गेली आहेत. दिग्दर्शक म्हणून करण जाधव यांनी भारतीय सिनेमाची सायको थ्रिलर पद्धतीत एक नवी आणि फ्रेश ट्रेंड आणली आहे. लोकांना घाबरवून सोडणाऱ्या पारंपरिक भयपटांच्या यादीत हा चित्रपट बसत नसला तरी याचाही एक वेगळा आणि मोठा प्रेक्षकवर्ग भारतात आहे, हे या चित्रपटाच्या रिविव्ह वरून कळतं.
छायाताई रॉक्स – अक्काची भूमिका छायाताईने केली नसती तर ती इतर कुणालाही जमली नसती. प्रत्येक सिन देताना तिचे एक्स्प्रेशनस् बघताना मजा येते. ‘ शेवटची पूजा ‘ करताना ती काळजाचा थरकाप उडवते, तिथेच ‘ त्या खोलीत जाऊ नको ‘ असा दम स्वतःच्या मुलीला भरतानाही तिचा चेहरा अगदी सरळ सकट आणि सोपा , नैसर्गिक अभिनय करून जातो. चित्तरंजन गिरी ने साकारलेला अनंत हावि होतो. ग्रामीण भागात ‘ भगत ‘ म्हणून एक व्यक्ती असते. भूत उतरवणं, बुवा – बाजी इत्यादी याचं काम. यांच्या बोलण्याची, रहाण्याची, चालण्याची आणि बघण्याची देखील एक विशिष्ट लकब असते. एखादा भगत लगेच त्याच्या देहबोली आणि वागण्यावरून लक्षात येतं. अशी ठेवणं ते करून घेत असतात. अनंत ची भूमिका करताना चित्तरंजन नी याचा पूर्ण अभ्यास केला आहे. त्याचं मुख्य काम एका सरकारी गाडीवर चालक म्हणून. दोन्ही भूमिका कुठेही mixup होत नाहीये. अगदी, सरकारी कपडे घालून जेव्हा तो ” अनंत” असतो तेव्हाही दोन्ही भूमिका आपल्या कप्प्यात व्यवस्थित बसलेल्या आहेत.
दादू साकारणारा विराट एक सुटसुटीत कलाकार आहे. आपण दादू करतो आहोत, म्हणजे नेमकं काय करतो आहोत हे त्याला ठाऊक आहे. दादू म्हणजे आक्काचा मदतनीस. एका काळ्या विद्या करणाऱ्या बाईचा मदतनीसाची भूमिका आजवर आपण कित्येकदा बघितली असेल. दादू साकारताना त्यातली एकही भूमिका संदर्भासाठी घेणं गरजेचं नाहीये. दादू पूर्ण वेगळं समीकरण आहे. साधा , ग्रामीण भागातला माणूस, तितकाच गूढ विद्येशी जवळून जोडला गेलेला. चेहेऱ्यावर हावभाव नैसर्गिक आणि गूढता जराही डळमळू न देता त्याने ही भूमिका साकारली आहे.
बार्दी या तंत्र विद्येवर आधारित ही कथा असली तरी मुळाशी मात्र ” दैवाशी दोन हात करू नये !” हा इतका सोपा संकेत आहे. कोणतेही विज्ञान आणि विद्या लोभामुळे इतरांसाठी घातक आणि प्राणघातकही ठरू शकतं. विज्ञान डोळ्याला दिसणाऱ्या वस्तू आणि घटकांना वास्तव मानत असतं. ते बरोबर आहे. पण डोळ्याला न दिसणाऱ्या आणि बुध्दीला न पटणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडल्या की त्यावर विश्र्वास अविश्वास दाखवण्याचा प्रश्न उरत नाही. वास्तव कितीही ओरडुन म्हणत असलं की डोळ्याच्या समोर असणारंच सत्य आहे, तरीही डोळ्यांना न दिसणाऱ्या गूढ तत्त्वाचा ही सृष्टीत तितकाच मोठा वाटा असतो. आपण एकटे आहोत हा भ्रम आहे. आपल्या आजूबाजूला जन्म आणि मृत्यू यात अडकून पडलेली असंख्य तत्व आहेत. याला वैज्ञानिक दुजोरा नसला म्हणून ती नाहीतच असं नाहीये. अगदी सोपं करून सांगायचं तर चांगलं आणि वाईट, देव आणि असुर, श्रद्धा – अंधश्रद्धा यात अडकून तयार झालेला गोंधळ कधीकधी , काही न उलगडणारी कोडी घालून जातो. असं एक साधं कोडं सुंदर पद्धतीने पडद्यावर मांडणारी कथा म्हणजे ” बारदोवी.” बार्दी ही विद्या , मृत माणसाला दोन स्टेप्स मध्ये पुनर्जीवित करते. एक त्याचं शरीर जिवंत होतं आणि दुसरी त्याची जन्माची पूर्ण स्मृती त्याला परत मिळते. आशय अतिशय सुरेख आहे. मांडणी ही त्याला साजेशी आहे. सिनेमा खूप काही शिकवून जातो, पण एक प्रश्न तसाच रहातो.
” हे सगळं खरं असतं का ? “
अनुराग अनिल
9823903323