नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाचा अनेक देश सामना करत असतानाच चीनच्या कुरापती सुरूच आहेत. लॉकडाऊनदरम्यान चीनने पुन्हा एकदा भारतीय सीमा ओलांडली आहे. चीनला योग्य ते प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने लडाखमध्ये लढाऊ विमान तैनात केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीही चिनी लष्करी हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत घिरट्या घालताना दिसली होती. त्यावेळीसुद्धा भारतीय हवाई क्षेत्राचे त्यांनी उल्लंघन केले होते.
चिनी हेलिकॉप्टरची हालचाल सुरू होताच भारतीय लढाऊ विमानांना लडाख सेक्टरमधील सीमा भागात तैनात करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी जवळच्या बेसकॅम्पवरून उड्डाण भरले आणि चिनी हेलिकॉप्टर्सला हुसकावून लावले. विशेष म्हणजे अशा स्थितीतही भारतीय लढाऊ विमानांनी भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले नाही. गेल्या आठवड्यात अशी घटना घडली होती, जेव्हा भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांमध्ये गुंतले होते. यानंतर दीडशेहून अधिक चिनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. लढाऊ विमान तैनात करून हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्याच्या चिनी प्रयत्नांना बऱ्याच वर्षात प्रथमच प्रतिसाद मिळाला आहे.