
अमळनेर-,शहरात साळीवाडा, माळीवाडा,अमलेश्वरनगर,शहाआलम नगर ,बोरसे गल्ली व त्या भोवतालचा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्याने हा भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे,या भागात प्रचंड निर्बंध असताना काही ठिकाणी किराणा,भाजीपाला,दूध,गॅस सिलेंडर,मेडिकल आदी अत्यावश्यक सुविधा मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत,यासाठी त्यांना या सुविधांपासून वंचित न ठेवण्यासाठी योग्य ते नियोजन करा अशी अपेक्षा वजा सूचना आ.अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्याकडे अमळनेर भेटीप्रसंगी मांडली.
यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ,डीवायएसपी राजेंद्र ससाणे,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यासह प्रशासन व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.यावेळी आ.पाटील कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांच्या व्यथा मांडताना म्हणाले की कोणतीही चूक नसताना या भागातील शेकडो कुटुंब आज बंदिस्त होण्याची शिक्षा भोगत आहेत,या भागात कोरोनाची वाढती रुगसंख्या पाहता शहराच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कंटेन्मेंट झोन करण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य नाही परंतु यामुळे उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांपासून ते वंचित राहायला नको,त्यांचा तिरस्कारही न होता आपल्याच सुरक्षेसाठी आपल्यावर निर्बंध दिले असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हायला हवी.घरपोच सेवेनंतर्गत दूध वाल्यास फोन केल्यास तो घरी यायला तयार नाही,किराणा वाल्यास सांगितल्यास त्यांची वाहने या झोनमध्ये येऊ शकत नाही,गॅस सिलेंडरची गाडीही पूर्ण घरापर्यंत येऊ शकत नाही,मेडिकल औषधांचीदेखील तशीच अवस्था असून चोरून लपून बाहेर जायचे म्हटल्यास गुन्हे दाखल होण्याची भीती अश्या अनेक अडचणी त्या लोकांनी आपल्याकडे मोबाईद्वारे मांडल्या असून एक परकेपणाची व शिक्षा भोगत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आंहे.तेथील परिस्थिती अधिक बिघडूनये यासाठी अत्यावश्यक साहित्याच्या घरपोच सेवेचे योग्य नियोजन करा.याचा आढावा प्रशासनाने वेळच्यावेळी त्या भागातील नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते अथवा सामाजिक संस्था व मंडळाच्या माध्यमातून घेत राहा,कोणते कुटुंब एकदम अडचणीत असतील त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून घ्या.आणि जे घरपोच सेवा देऊ शकतील त्यांचेच नंबर जाहीर करा.या भागात अजून कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी आरोग्य पथक आणि पालिकेस योग्य त्या सूचना करून घर टू घर सर्व्हे करण्यावर भर देऊन संशयितांना तात्काळ कोविड सेंटरला हलवा.आवश्यकता वाटल्यास तात्काळ त्यांचे स्वेब घेऊन अहवाल लवकरात लवकर मागवून घ्या जेणेकरून उपाययोजनेत वेग आणता येईल.ज्या कुटुंबांना होम क्वांरटाईन केले आहे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेऊन त्यांनाही अत्यावश्यक सुविधापासून वंचित ठेऊ नका.आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या पुरवठादारांना देखील पोलिसांनी योग्य ते सहकार्य करा जेणेकरून ते देखील या सेवा पुरविण्यास मागे हटणार नाहीत.आदी सूचना आमदारांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत केल्याने त्यांनी तात्काळ यावर कार्यवाहीच्या सूचना स्थानिक प्रशासनास केल्या.
दरम्यान आ.अनिल पाटील यांनी कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की तुम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच कंटेन्मेंटझोनमध्ये आहात यामुळे प्रशासन निर्बंध म्हणून ज्याज्या सुचना करेल त्या नक्कीच पाळा,आपले शहर कोरोनापासून वाचविण्यासाठी आपण हे सर्व करीत असून याचे फलित लवकरच आपल्याला दिसून येणार आहे,आज अनेक कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेय याची जाणीवही आम्हाला आहे,मात्र घाबरू नका शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी व येथील संपुर्ण जनता आपल्या सोबत आहे.अत्यावश्यक सेवा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्राशसन करीत आहे,यासाठी नगरपालिकेने देखील नियोजन केले आहे,या नियोजनात हळूहळू सुधारणा होऊन कोणीही वंचित राहणार नाही.फक्त आपल्या भूमीसाठी काही दिवस त्रास सहन करा आणि घरातच सुरक्षित राहा असा सल्ला आ.अनिल पाटील यांनी दिला आहे.
