‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’  ! कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केल्या भावना जळगाव जिल्ह्यातील दुसरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला

0

जळगाव (जिमाका) दि. 6 –  ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’ ! अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंगसे, ता. अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेचे 14 दिवसांच्या उपचाराअंती शेवटचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी पाठविण्यात आले. कोरोनावर मात करणाऱ्या त्या जिल्ह्यातील दुसऱ्या तर पहिल्याच महिला रुग्ण ठरल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मुंगसे येथील महिला कोरोना बाधित आढळून आली होती. या महिला रुग्णाचा दुसरा व तिसरा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे त्यांना आज टाळ्यांच्या गजरात घरी पाठविण्यात आले. रुग्णालयातून जाताना ही महिला भावनाविवश झालेली दिसून येत होती. शिवाय तीच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील, डॉ विजय गायकवाड यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असताना जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील पहिला रुग्ण तीही महिला आज कोरोनामुक्त होऊन घरी जाणार असल्याने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड 19 रुग्णालय परिसरात सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: परिचारिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. गेले चौदा दिवस त्यांनी धैर्यपूर्वक केलेल्या उपचारामुळे जिल्ह्यातील दुसरा व पहिलीच महिला रुग्ण बरी होऊन घरी जाणार होती. डॉ. खैरे आणि त्यांच्या टीमने 14 दिवस या रुग्णांवर उत्तमरितीने उपचार केले. उपचारादरम्यान वृद्ध महिलेनेही डॉक्टर आणि परिचारिकांना प्रतिसादही दिल्यानेच हे घडले.

आज या महिला रुग्णांस उत्साहात व टाळयांच्या गजरात निरोप देण्यात आला. यावेळी या महिलेस विचारले असता ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप, भाऊ शेतस्’ ! सगळयांचे चांगले होईल असा माझा आशिर्वाद  असल्याचे उद्गार काढले आणि रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम सार्थकी लागले. त्यानंतर त्यांना एका रुग्णवाहिकेतून मुंगसे, ता. अमळनेर येथे त्यांच्या घरी पाठविण्यात आले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. आजच्या घटनेमुळे या आजारातून बरे होता येते हा विश्वास जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण करता आला. तर जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी विश्वासाने आणि जिद्दीने उपचार करणाऱ्या रुग्णालयाच्या टीमचे अभिनंदन केले. तसेच नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरीत रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

        डॉ भास्कर खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा रुग्ण कोरोनामुक्त झाला याचे समाधान आहे. नागरीकांनी कोरोनाला घाबरु नये, पण काळजी घ्यावी. तसेच आमच्याकडे उपचार घेत असलेले रुग्ण लवकरच बरे होऊन त्यांना सुखरुप घरी पाठविण्यात आम्हाला यश येईल अशा अशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

        डॉ. विजय गायकवाड, उपचार करणारे डॉक्टर- वैद्यकीय महाविद्यालय नव्यानेच सुरु झाले आहे. त्यातच हा आजार नवीन असल्याने सुरूवातीस भिती होती. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सर्वाना दिली. रुग्णांना धीर देण्यावर भर दिला. हे एक टीमवर्क आहे. रुगण वाढत असताना जिल्हावासियांच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे रुग्ण बरे होत असल्याचे समाधान आहेच, त्यापेक्षाही रुग्णांना आम्ही बरे करू हा विश्वास मनात निर्माण झाला आहे.

कोरोना संसर्ग वार्डात पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन शिप्टमध्ये डॉक्टर, पारिचारिक असा एकूण 36 जणांचा स्टॉप अहारोत्र कार्यरत होता. यात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, पारिचारिका व कर्मचारी, नेहा चौधरी, रोहन केळकर, शालीनी खानापूरकर, डॉ. प्रसाद, तुषार सोनवणे, गजानन चौधरी, सविता अग्नीहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनिषा सोळुंखे, शंकुतला सुरवाडे, निलम पाटील यांनी अहारोत्र रुग्णांची सेवा केली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन त्याला 17 दिवसात बरे करण्यात या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे. या कालावधीत जिल्हा सामान्य रुगणालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे यांचेही सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here