इंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा:मुद्रा – चौथी

0

मनमाड: इंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा.
मुद्रा – चौथी ,आपल्या शाळेच्या 98 वर्षाच्या प्रवासात शाळेने हजारो विद्यार्थी घडविले यापैकी काही विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तुत्वाने शाळेचा नावलौकिक वाढविला. शतकाकडे वाटचाल करताना अशा कर्तुत्ववान विद्यार्थ्यांचा परिचय माझ्या *”सुवर्णमुद्रा”* या सदरात करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न मी करतोय.
बँक अधिकारी ते पोलिस अधिकारी असा थक्क करून सोडणारा प्रवास केलेला आजचा आपला माजी विद्यार्थी, 87 च्या एस एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेला नंदकुमार ठाकूर. आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक कै. ठाकूर सर यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले नंदकुमार यांनी 1989 मध्ये आपल्याच शाळेतून बारावी उत्तीर्ण केले, धुळ्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथे प्रवेश घेऊन कृषी पदवी संपादन केली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम एस सी ॲग्री ही पदव्युत्तर पदवी अग्रोनोमी अर्थात शेतीशास्त्र या विशेष विषयातून मिळवली. कृषी शाखेत पदवी प्राप्त करण्याचा घेतलेला निर्णय हा नंदूच्या दूरदर्शीपणाची साक्ष देतो, एका अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की राज्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांतील बहुसंख्य विद्यार्थी हे कृषी शाखेचे पदवीधर असतात. कृषी शाखेतील अभ्यासक्रम हा स्पर्धा परीक्षांना पूरक असतो, स्पर्धा परीक्षांसाठी पोषक असे वातावरण या अभ्यासक्रमात असते. या अभ्यासक्रमाचा फायदा नंदूला देखील झाला. नोकरी मिळत नाही अशी तक्रार करणारे हजारो विद्यार्थी आपल्याला दिसतील पण मिळालेल्या अनेक नोकऱ्या सोडलेला एक विद्यार्थी म्हणजे नंदू ठाकूर. मनासारखी नोकरी मिळत नाही तोपर्यंत अनेक नोकऱ्या त्याने नाकारल्या, संरक्षण खात्यातील ऑडिटर , इन्कम टॅक्स खात्यातली नोकरी देखील त्याने नाकारली.
बँकिंग सर्विस रिक्रुटमेंट बोर्डने घेतलेली परीक्षा उत्तीर्ण होऊन तो बँक ऑफ इंडिया मध्ये कृषी सहाय्यक म्हणून रुजू झाला. जेमतेम सहाच महिने त्याने ही नोकरी केली. सहा महिन्यानंतर 95 साली मंत्रालयात कक्ष अधिकारी ही गॅझेटेड ऑफिसरची नोकरी त्याला मिळाली, त्याने दोन वर्ष मंत्रालयात काम केले.
98 साली एम पी एस सी मार्फत डी वाय एस पी या पदासाठी त्याची निवड झाली. 1 जानेवारी 98 ते 31 डिसेंबर 98 या काळात नाशिक येथील पोलिस अकादमीत खडतर प्रशिक्षण घेऊन शिकाऊ पोलिस अधिकारी म्हणून एक जानेवारी 99 रोजी नंदकुमार कोल्हापूर जिल्ह्यात रूजू झाले. त्यांच्या कार्यक्षेत्रात त्या वेळेस मटका, जुगार, बेकायदेशीर दारू विक्री, आदी व्यवसाय तेजीत होते. नंदकुमार यांनी या व्यवसायांवर धाडी टाकल्या मोठ्याप्रमाणावर गुन्हे दाखल केले व जरब बसवली.
जानेवारी 2000 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील देवरी या नक्षल प्रवण विभागात त्यांची डी वाय एस पी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या भागात काम करणे म्हणजे एक आव्हानच होते. पण हे आव्हान त्यांनी स्वीकारले, नक्षलवाद्यांशि सामना करून अनेक हत्यारे व स्फोटके जप्त केली. चार उच्चपदस्थ नक्षलवाद्यांना पकडण्यात त्यांना यश आले. परिसरातील नागरिकात नक्षलवाद्यां बद्दल सहानुभूती असल्याचे नंदू यांच्या लक्षात आले, नागरीक पोलिस व प्रशासनाचाही तिरस्कार करत असल्याचे लक्षात आल्यावर, यामागची कारणे शोधण्यास त्यांनी सुरुवात केली तेव्हा हा संपूर्ण भाग विकासापासून वंचित आहे हे त्यामागील मूळ कारण असल्याचे जाणवले. आपल्या कार्यक्षेत्रात “ग्राम दत्तक योजना” सुरू केली. ही योजना सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभाग, या सर्वांशी समन्वय साधला होता. या समन्वयातून तेरा ते चौदा गावे एक वर्षासाठी दत्तक घेण्यात आली, दत्तक घेतलेल्या गावात कुपनलिका खोदणे, रस्ते बांधणे, वीज पुरवठा करणे, सौर चुलीचे वाटप करणे, विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत प्रवेश मिळवून देणे, विजेच्या मोटारी , डिझेल पंप देणे, वराह पालन, कुकुट पालनासाठी अर्थ सहाय्य करणे, अशा अनेक योजना पोलिसांमार्फत राबविण्यात आल्या. आदिवासी विकासाच्या अनेक योजना असल्या तरी त्यांचा फायदा स्थानिक आदिवासींना होत नव्हता, आदिवासी विकास विभागाच्या योजनांचे वैशिष्ट्य असे की अधिकाऱ्याने स्वतःची योजना तयार करुन ती विभागाला सांगावी व विभागामार्फत या योजनेसाठी निधी दिला जात असे. याचा फायदा घेऊन आदिवासींनी गोळा केलेले तेंदूपत्ता पोलीस विकत घेऊन व्यापार्‍यांना विकू लागले यामुळे नक्षलवाद्यांना मिळणारा मलिदा नष्ट झाला व आदिवासींना जास्त उत्पन्न मिळू लागले. गावाच्या समस्या, गरजा जाणून घेण्यासाठी गावातील शिकलेल्या तरुणांचे एक मंडळ पोलिस खात्यामार्फत तयार करण्यात आले, हे मंडळ गाव व पोलिस खाते यांच्यामध्ये समन्वय साधण्याची भूमिका पार पाडत असत. या मंडळाच्या माध्यमातून गावाच्या समस्या सोडविण्यास सुरुवात झाली. गावातील शिकलेल्या तरुणांना पोलिस खात्यात भरती करण्यात आले. या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की गावकऱ्यांमध्ये प्रशासन व पोलिसांत बद्दल आपुलकी निर्माण झाली. नक्षलवाद्यां बद्दल असलेला जिव्हाळा नष्ट झाला. पुढे जाऊन अशी परिस्थिती आली की दत्तक घेतलेल्या गावात नक्षल्यांना जेवण मिळणे देखिल कठीण होऊ लागले. या गावातील विकासाच्या वार्ता कानी पडल्यानंतर इतर गावातील नागरिक देखील पोलिसांशी संपर्क करू लागले, आमची गावे दत्तक घ्या म्हणून विनवणी करू लागले, त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनाने तुम्ही नक्षलवाद्यांशी असलेले संबंध सोडा आम्ही गावे दत्तक घेऊन विकास योजना राबवू असे त्यांना सांगितले. गावकऱ्यांनी देखील ही अट मान्य केली , काही वर्षातच या भागातील नागरिकांवर असलेला नक्षलवाद्यांचा पगडा नष्ट करण्यात यश आले. कोणतीही ही गोळी न चालवता नक्षलवाद्यांचा बंदोबस्त नंदू यांनी केला. या कामगिरीची दखल घेऊन राज्याच्या गृह खात्याने “खडतर सेवा पदक” तत्कालिन पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा गौरव केला. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांनी देखील एक परिपत्रक काढून देशभरातील नक्षलग्रस्त भागातील गावे पोलिसांनी दत्तक घेऊन तेथे सुधारणा कराव्यात असे फर्मान जारी केले कदाचित हा योगायोग असावा.
2003 मध्ये अकलूज येथे त्यांची बदली करण्यात आली. हा भाग दरोडेखोर प्रवण क्षेत्र होता, मोठ्याप्रमाणावर घरफोड्या होत असत, नंदू ठाकूर यांनी धाडी टाकून पाच अस्सल दरोडेखोरांना जेरबंद केले, त्या भागातील दरोडेखोरी नष्ट झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे पंढरीच्या विठुरायाच्या वारीची सेवा करण्याची संधी त्यांना या नियुक्तीने मिळाली व चार वर्षातील आषाढी-कार्तिकी अशा सलग आठ वाऱ्यांची सेवा त्यांनी केली, त्यांच्या सेवेवर विठुराया प्रसन्न झाला.
2007 मधे बढती मिळून ते नाशिकच्या पोलिस अकादमीमध्ये सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून नियुक्त झाले. हे काम प्रशिक्षण देण्याचे होते, अर्थात शिक्षकी पेशाचे त्यांना हा पेशा वारस हक्काने लाभला असल्याने काम करण्यात विशेष आनंद वाटला. आपल्या चार वर्षाच्या कालावधीत सुमारे पाच हजारापेक्षा अधिक पोलिस उपनिरीक्षक, सुमारे दीडशे डी. वाय. एस. पी. जवळपास 30 महाराष्ट्र केडर मधील आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले.
2008 ला केंद्र सरकारने त्यांनी नक्षलवादी क्षेत्रात बजावलेल्या उत्तम कामगिरीची च दखल घेऊन “अंतर्गत सुरक्षा पदक” देऊन सन्मानित केले.
2011 मध्ये रत्नागिरी येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती हे एक मोठे आव्हानच होते, त्यांच्या कार्यक्षेत्रात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प येत होता, या प्रकल्पस्थळी मोठी आंदोलने चालू होती, हा संपूर्ण जिल्ह्यात संवेदनशील होता. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळणे मोठे जिकरीचे व कौशल्याचे काम होते. पण कुठलाही बळी न जाता, बळाचा वापर न करता हे आव्हान त्यांनी लीलया पेलले.
2013 ला त्यांना “पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह” देऊन गौरविण्यात आले. 14 ला त्यांची जळगाव येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली, जळगाव जिल्हा हा तसा धार्मिक दृष्ट्या संवेदनशील जिल्हा, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जनक्षोभ होऊ न देता कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखत कार्यक्षेत्रातील दरोडे, चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले. अनेक अट्टल गुन्हेगारांना अटक केली.
2016साली त्यांची पुन्हा महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली करण्यात आली. या वेळेस त्यांची भूमिका प्रशिक्षकाची न राहता प्रशासकीय अधिकाऱ्याची होती. या कामाला देखील त्याने उत्तम न्याय दिला, या अकादमीतील ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चर (प्रशिक्षणासाठीच्या मूलभूत सोयीसुविधा) तयार करण्याचे महत्त्वाचे काम केले. पोलीस अधिकाऱ्यांसाठी इंन सर्विस प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षण कोर्सेस सुरु केले,अकादमीत सेवा देणार्‍या कर्मचाऱ्यांसाठी आठ मजली भव्य असे स्टाफ क्वार्टर त्यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले त्या काळातील नाशिक मधील उंच इमारतीं पैकी एक इमारत असा नावलौकिक या इमारतीचा होता. अशा प्रकारचे महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिलेच स्टाफ क्वार्टर होते. तेथील वस्तीगृहाचा दर्जा सुधरवुन आधुनिक रूप दिले.
2018 मध्ये मुंबईत लष्कर विभागात डीसीपी म्हणून ते काम बघू लागले. या काळात मुंबईत सी ए ए ,370 कलम, बाबरी मशीद, अशा वेगवेगळ्या आंदोलनांना बंदोबस्तासाठी मनुष्यबळ पुरवणे, हत्यारे पुरवणे, उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करणे, अशी कामे त्यांना करावी लागली. ही कामे त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. कुठल्याही अतिरिक्त बळाचा व हत्यारांचा वापर न करता शांतपणे सर्व आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हाताळली.
.15 ऑगस्ट 19, रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे “मेडल फॉर एक्सलन्स इन ट्रेनिंग ” हा सन्मान देऊन नासिक पोलिस अकादमीत केलेल्या कार्याचा गौरव केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला.
2020 आली त्यांना अतिशय मानाचे समजले जाणारे “राष्ट्रपती पोलीस पदक” जाहीर झाले. देशातील पोलीस व संरक्षण खात्यात नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची मनोमन इच्छा असते की आपल्या सेवाकाळात एकदातरी आपल्याला हा पुरस्कार मिळावा. आपल्या मेहनतीच्या व सचोटीच्या जोरावर नंदू ठाकूर यांना 2020 सालचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. लवकरच महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल महोदय यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले जाईल. अशा प्रकारचे पदक मिळवलेले मनमाड शहरातील ते एकमेव पोलीस,व संरक्षण दलातील अधिकारी आहेत.
नुकतीच त्यांची गुन्हे प्रकटीकरण खात्यात बदली करण्यात आली असून, गुन्हे प्रकटीकरण खाते हे गुन्हे प्रकट करण्यासाठी मेहनत घेणारे खाते म्हणून ओळखले जाते. संशोधनात्मक पद्धतीचे अतिशय किचकट काम नंदू यांनी स्वीकारले असून, फेसबुक, इंस्टाग्राम, अशा समाज माध्यमांवर सेलिब्रिटींच्या पोस्टला असलेल्या लाईक, फॉलोविंग, शेअर, विव्ज, यांची संख्या फुगवून दाखवणारी टोळी जेरबंद केली आहे, अशा प्रकारच्या टोळ्या सेलिब्रिटींच्या पोस्टवरील लाईक, फॉलोविंग, विव्ज, वाढवून दाखवतात, या सेलिब्रिटींना मिळणारी कामे व मानधन यात वाढ होते. या टोळ्यांचा बंदोबस्त झाला असला, तरी या मागील सेलिब्रिटी कोण आहेत याचा शोध घेण्याचे काम चालू आहे.
अत्यंत मितभाषी असलेले नंदू ठाकूर उच्चपदस्थ असले तरी सहज कोणालाही उपलब्ध होतात, ही त्यांची खासियत आहे. लोकांशी मिळून मिसळून, आपुलकीने वागणे, व त्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाय करणे या गुणांमुळेच पोलीस खात्यात ते नानाविध पदकांचे मानकरी ठरले आहेत. त्यांच्या यशात आपल्या विद्यालयाचा फार मोठा वाटा आहे हे नम्रपणे ते नमूद करतात. यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here