नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चक्रीवादळ अम्फान बुधवारी संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगालमध्ये पोहोचेल. ओडिशामध्ये जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे चक्रीवादळाची गती थोडी कमकुवत झाली आहे ही दिलासाची बाब आहे. सकाळपासूनच ओडिशाच्या पारादीपमध्ये जोरदार वारा सुटला आहे. याठिकाणी प्रति तास ८२ किमी वेगाने जोरदार वारे वाहत आहेत.
पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या सर्वाधिक धोका असणाऱ्या भागांना प्रशासनाकडून खाली करण्यात आले आहे. महाचक्रीवादळ वादळ अम्फान १८० किमी / ताशी वेगाने पुढे येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी संध्याकाळपर्यंत अम्फान सुपर चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओरिसा किनाºयावर पोहोचेल. सध्या सुपर चक्रीवादळ अम्फान पश्चिम बंगालच्या दिशेने १८० किमी / ताशी वेगाने पुढे येत आहे.
दोन्ही राज्ये सतर्कतेवर आहेत. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ४० एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने पश्चिम बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि कोलकाता, हुगळी, हावडा, दक्षिण आणि उत्तर २४ परगना तसेच पूर्व मिदनापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते असा इशारा दिला आहे.
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपुरात जोरदार वारे वाहू लागले आहेत आणि समुद्रामध्ये भरती वाढली आहे. चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून रोखले गेले आहे. आजूबाजूचा परिसर पूर्णपणे रिकामी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे की, बऱ्याच ठिकाणी रेल्वे व रोड वाहतूक विस्कळीत होऊ शकतात, वीज व दळणवळणाचे खांब उखडले जाऊ शकतात आणि सर्व प्रकारच्या कच्च्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. पिके, फळबागा आणि बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.