Home राज्य पाकव्याप्त काश्मीरमधून ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत

पाकव्याप्त काश्मीरमधून ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत

0

जम्मू (वृत्तसंस्था) : सध्या जगावर कोरोनाचे थैमान माजले असताना भारतावर कोरोनासोबत आणखी एक संकट उभे आहे. नियंत्रण रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये ३०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पण जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या पाकिस्तानच्या योजनेला आळा घालण्यासाठी सुरक्षा जवानही सज्ज आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी ही माहिती दिली.

दिलबाग सिंग म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या उद्देशाने मोठ्या संख्येने दहशतवादी सीमेपलीकडे जमले आहेत. काश्मीर खोऱ्यात घुसखोरीच्या यापूर्वीही चार घटना झाल्या आहेत आणि राजोरी-पुंछ भागात असे दोन-तीन प्रयत्न झाले आहेत. पाकिस्तानचे आयएसआय, सैन्य आणि इतर एजन्सी सक्रिय आहेत आणि दहशतवाद्यांच्या तळावर प्रशिक्षित दहशतवादी सज्ज आहेत. आमच्या यंत्रणांच्या ताज्या माहितीनुसार काश्मिरच्या दहशतवाद्यांची अंदाजे संख्या १५० ते २०० पर्यंत आहे, तर दुसऱ्या बाजूला (जम्मू प्रदेशात) १०० ते १२५ दहशतवादी आहेत असे त्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांचे चार गट जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी झाले होते. चालू वर्षात दोन ते तीन दहशतवादी संघटनांनी आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) मध्ये घुसखोरी केली आहे. पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये ३० दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या बातम्या आल्या आहेत असे पोलीस प्रमुखांनी सांगितले.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर भाग मिळून जवळपास ३० दहशतवादी असू शकतात ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. जम्मू-काश्मीरच्या अंतर्गत भागात २४० हून अधिक दहशतवादी सक्रिय आहेत. ही संख्या सातत्याने कमी होत आहे. यावर्षी आम्ही २७० च्या आकड्याने सुरुवात केली होती. आज ही संख्या २४० च्या जवळ आहे. आम्ही आतापर्यंत ७० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यशस्वी झालो आहोत. यात विविध दहशतवादी संघटनांचे २१ कमांडर देखील आहेत. ते काश्मीर आणि जम्मू भागात सक्रिय होते अशी माहिती दिलबाग सिंग यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here