नाशिक -२७ / ० ९ / २०२० ग्रामीण पोलीस दलातील अंमली पदार्थ शोधक श्वान शेराचा वाढदिवस साजरा नाशिक ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकामधील अमली पदार्थ शोधक म्हणुन कार्यरत असलेला शेरा या जर्मन शेफर्ड श्वानाचा वाढदिवस श्वान पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत मा.पोलीस अधीक्षक श्री.सचिन पाटील सो . यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला . शेरा हा पोलीस श्वान पथकातील तरबेज श्वान आहे . ग्रामीण पोलीस दलात एकुण तीन श्वान कार्यरत आहेत . त्यापैकी जर्मन शेफर्ड शेरा हा अंमली पदार्थ शोधक म्हणुन कार्यरत असुन डॉबरमॅन टॉमी व राणा हे गुन्हे शोधक म्हणुन कार्यरत आहेत . शेरा हा श्वान एक महिन्याचा असल्यापासुन ग्रामीण पोलीसांबरोबर आहे . शेराला राजस्थान , नल्हा अलवार येथील सशस्त्र सीमाबल ट्रेनिंग सेंटर येथे अंमली पदार्थ शोधक ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आले होते . अंमली पदार्थ शोधण्याची कला अवगत झाल्यानंतर शेरा ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे . गतवर्षात महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात शेरा या श्वानास चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते , तसेच नाशिक परिक्षेत्रातील पोलीस कर्तव्य मेळाव्यातही प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवुन शेराने यश संपादित केलेले आहे . शेराचा आज दि . २७ / ० ९ / २०२० रोजी तिसरा वाढदिवस असल्याने ग्रामीण पोलीस दलाचे श्वान पथकाने केक कापुन व शेराने केक खावुन , त्याचा वाढदिवस साजरा केला . सहसा गुन्हेगार शोधुन काढण्यामध्ये व गुन्हयाचा तपास करण्यामध्ये पुष्कळदा पोलीस दलातील या मुक श्वानांचा सिंहाचा वाटा असतो . त्यांच्या कामगिरीचा यथोच्छ सत्कार व जनमाणसात त्यांच्या या कर्तुत्वाची जाणीव होणे आवश्यक आहे असे मत मा . पोलीस अधीक्षक साो यांनी व्यक्त केले . यावेळी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.सचिन पाटील सो , श्वान पथकाचे पोना विनायक राउत , पोना बोरसे , पोकॉ संतोष जोपुळे , महाले , ढुमसे असे उपस्थित होते . तसेच ग्रामीण पोलीस दलात गुन्हे शोधक म्हणुन कार्यरत असलेले श्वान टॉमी व राणा यांनी गतवर्षात मनमाड व कळवण पोलीस ठाणेकडील खुन व चोरीचा गुन्हा उघडकीस केलेली आहे . गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी श्वानाचे कार्य हे नेहमीच महत्वाचे ठरत असते .