इंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा-मुद्रा -तिसरी* *उद्यमशीलता व अध्यात्म यांचे उत्तम फेब्रिकेशन

0

मनमाड : ( हर्षद रमाकांत गद्रे ) इंडियन हायस्कूल शाळेत शतकाच्या प्रवासात शाळेने हजारो विद्यार्थी घडविले, या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी स्वकर्तुत्वाने मोठे झाले त्त्यांच्या कामगिरीमुळे शाळेच्या ही नावलौकिकात भर पडली अशा काही कर्तुत्ववान विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून मी करतोय.
आज अशाच एका कर्तुत्ववान माजी विद्यार्थ्यांची ओळख आपल्याला करून देत आहे. आपल्या शाळेतून 74 सालच्या अकरावी मॅट्रिकच्या बॅच मधील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी व आजचा नावाजलेला उद्योगपती आणि अध्यात्मिक , सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविला एक सामाजिक अभियंता(Social Engineer ) म्हणजेच तुलसीदास पहुजा. सुभाष रोड परिसरात लहानाचे मोठे झालेले तुलसीदासजिंचे वडील रेल्वेत नोकरीस होते. सामान्य परिवारात लहानाचे मोठे झालेल्या तुलसीजींनी दहावी मॅट्रिक परीक्षेतील उज्वल यशानंतर धुळे येथे गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेजमधून डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग पदविका प्राप्त केली.
भावी आयुष्याची स्वप्ने रंगविण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थात पुणे येथे येऊन ते दाखल झाले . पुण्यातील थरमॅक्स कंपनीत अभियंता म्हणून नोकरी मिळाली, नोकरी करत असतानाच त्यांनी ज्ञानार्जन सुरू ठेवले. पुण्याच्या गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक मधून प्रोडक्शन इंजिनीअरिंगची पदविका प्राप्त केली. त्यांचे लक्ष सदैव कंपनीची उत्पादकता, गुणवत्ता वाढुन औद्योगिक कलह मुक्त कंपनी कशी राहील याचा ते विचार करत असत. तो काळ म्हणजे भारतात कामगार संघटनांचा सुवर्णकाळ होता, अनेक औद्योगिक आस्थापनात संप, टाळेबंदी हे नित्याचे झाले होते. मुंबईतील अनेक कापड गिरण्यांना घरघर लागून त्या बंद पडल्या होत्या. अशा परिस्थितीत औद्योगिक कलह दूर करून कामगार व व्यवस्थापन यांचे संबंध सुधारले पाहिजेत यासाठी मोठ्या विचाराअंती व अनुभवाच्या जोरावर त्यांनी कंपनीत क्वालिटी सर्कल मुव्हमेंट नावाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
सुमारे तीन वर्ष सातत्याने हा उपक्रम कंपनीत राबविला. या उपक्रमाअंतर्गत कामगारांचे गट बनविले गेले, या वीस कामगारांच्या गटासाठी दोन दिवसांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला जायचा, अशी प्रशिक्षणाची 25 सत्रे राबवून सुमारे साडेचारशे ते पाचशे कामगारांना प्रशिक्षित केले. या प्रशिक्षित कामगारांकडून कंपनीतील कामानंतर कंपनीच्या जागेत भरीव कार्य करून घेण्यास सुरुवात करण्यात आली, यात प्रामुख्याने नवीन औद्योगिक संशोधन करण्याचा प्रयत्न करणे, नवीन हत्यारे, अवजारे विकसित करणे, अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन करणे, या स्वरूपातली कामे कामगार गटानुसार करू लागले. याच कामांमध्ये औद्योगिक संबंध सुधारण्यासाठी व कंपनीच्या उत्पादन आणि गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी देखील कामगार विचार मंथन करू लागले. सुरुवातीच्या काळात सहकारी अभियंते व कामगारांकडून या उपक्रमाची हेटाळणी झाली म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही पण तुलसीजी मात्र ठाम होते. आपल्या देशात चाकोरी सोडून एखादे चांगले काम करण्याचा कोणी प्रयत्न केला तर समाज त्याला विरोधच करतो असेच तुलसीजिंच्या बाबतीत देखील घडले. पण हळूहळू उपक्रमाचे यश दिसू लागले, कंपनीची उत्पादकता, गुणवत्ता, वाढू लागली कंपनीमध्ये औद्योगिक शांतता निर्माण होऊ लागली, व्यवस्थापन व कामगार यांचे संबंध सुधारले, ह्या उपक्रमा कडे बघण्याचा कामगारांचा आणि व्यवस्थापनाचा दृष्टिकोन बदलला. तुलसीजी आता कामगार व व्यवस्थापकांच्या दृष्टीने हीरो बनले होते,ते आता कामगार क्षेत्रातले तज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. या यशाची वार्ता इतरही अनेक कंपन्यात जाऊन पोहोचली. देशभरातिल विविध कंपन्यातून त्याना निमंत्रणे येऊ लागली. ॲटलास कॅपको, महिंद्रा, मारुती उद्योग, बजाज ऑटो व इतर अनेक सरकारी उपक्रमांमध्ये हा उपक्रम राबविला जावू लागला.अनेक औद्योगिक अस्थपनात आजही राबविला जातो. सुमारे तीन वर्ष हा उपक्रम सातत्याने त्यानी कंपनीत राबविला . महिला बचत गटाची संकल्पना याच उपक्रमावर आधारलेली आहे.
या कार्याची दखल 91 साली केंद्र सरकारने घेतली, थरमॅक्स कंपनीला या उपक्रमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपक्रमाच्या यशामुळे तुलसीजींच्या ज्ञानाची उंची जरी वाढली असली तरी त्यांचे पाय जमिनीवरच होते. त्यांच्यातला आत्मविश्वास वाढला, आपण काहीतरी करू शकतो, उत्पादकता वाढवू शकतो, आणि आपण आपल्या यशा बरोबर कामगारांना न्याय देऊ शकतो, याची जाणीव त्यांना होऊ लागली. 91 साली राजीनामा देऊन स्वतःचा उद्योग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कामगारांशि असलेले संबंध, कामगारांचे व्यवस्थापन करण्यात मिळवलेला नावलौकिक, यामुळे उत्पादन क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला धर्मपत्नी सरला ह्यानी मोलाची साथ दिली.तुलसी व सरला ह्यांच्या आपापसातिल उत्तम फॅब्रिकेशन मधून तुसार फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग नावाच्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली . चाकण औद्योगिक वसाहतीत आज मोठ्या दिमाखात कंपनी कार्यरत आहे. उद्योग सुरू करताना अनेक अडचणी आल्या पण त्यावर मात करून त्यानी वाटचाल सुरु ठेवली. स्वतःच्या उद्योगात ते मेहनत करत होते, सचोटी, प्रामाणिकपणा, ह्या मुळे उत्पादने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होती. अल्पावधीतच उत्पादनांना पुणे परिसरात मोठी मागणी मिळाली, एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाऊ लागले.
1999 सालच्या सुमारास जागतिक मंदी आली, पण उपजात बुद्धिमत्ता, कोणत्याही अडचणींवर मात करण्याची क्षमता असलेल्या तुलसीजीनी या मंदीचे संधीत रूपांतर केले. जागतिक मंदीचा फायदा घेऊन आपल्या उद्योगाचे कार्यक्षेत्र विस्तारले युरोप, अमेरिका खंडातील अमेरिका, इटली, स्वीडन, या देशातील नावाजलेल्या कंपन्यांना आपली उत्पादने पुरविण्यास आरंभ केला. जागतिक स्तरावर मोठ्या उद्योग-धंद्यात वापरल्या जाणाऱ्या औद्योगिक फर्नेसच्या (भट्टी) बाहेरील केसिंग(आवरण) तयार करण्यात कंपनीचा हातखंडा समजला जातो. या क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादने तयार करण्यात व उत्पादनांचा दर्जा जागतिक पातळीवरचा राखण्यात त्यांना यश आले असून दरवर्षी सुमारे दहा कोटी रुपयांची निर्यात ते जगातील विकसित देशात करतात. देशांतर्गत देखील मोठ्या प्रमाणावर त्यांची उत्पादने वापरली जातात. एक नावाजलेले उद्योजक म्हणून देश-विदेशात तुलसीजिंची ख्याती आहे.
सतत नवीन शिकण्याची हौस, नवीन काहीतरी करण्याची उर्मी असल्याने त्यांचे लक्ष सामाजिक, आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्राकडे वळले. त्यांनी डिप्लोमा इन वेदांत फिलॉसॉफी नावाचा सहा वर्षाचा अर्धवेळ अभ्यासक्रम उद्योग सांभाळून पूर्ण केला. या अभ्यासाने त्यांचा वेद, उपनिषद,गिता यांचा चांगला अभ्यास झाला. विचारांची बैठक पक्की झाली. त्यांनी “सिंधियत” नावाच्या पुस्तकाचे लिखाण केले. अध्यात्मिक क्षेत्राला वाहिलेल्या या पुस्तकात सिंधी पौराणिक कथांवर आधारित प्रबोधन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पुस्तक अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झाले. त्यांनी युट्युब वर “सिंधियत फिलॉसॉफी” नावाचे च्यानल सुरु केले, त्याद्वारे अध्यात्मिक, धार्मिक,व कौटुंबिक कलह नष्ट करणे, घटस्फोट टाळण्यासाठी प्रयत्न करणे, अशा विषयांवर समुपदेशन, मार्गदर्शन, करण्याचा प्रयत्न सुरु केला. हिंदी, इंग्लिश, व सिंधी या तीनही भाषेतून हे चॅनेल युट्युब वर उपलब्ध आहे.
2011साली भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने त्यांच्यातील उद्योजकतेला “एक्स्पोर्ट वर्ल्ड” नावाचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुण्याच्या भारती विद्यापीठाने यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा सन्मान केला. त्यांच्या कंपनीला आय एस ओ 9001 हे सर्टिफिकेशन 2015 साली प्राप्त झाले असुन.मेक इन इंडिया अंतर्गत त्याना “Most reliable fabrication supplier” ह्या विभागा करिता सन्मानित करण्यात आले आहे. उद्योग व सामाजिक,आध्यात्मिक कार्याचा व्याप सांभाळून आपली जन्मभूमी मनमाडवर खास प्रेम आहे. आपल्या वर्ग मित्रांना भेटण्याची,व त्यांच्या सहली आयोजित करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत, आपल्या विद्यालयाच्या अमृत महोत्सवाला उपस्थित राहून भरगोस अशी देणगी त्यांनी त्यावेळी ,व मागील वर्षी देखील दिली होती. त्यांचे जिवलग मित्र मोहनअण्णा गायकवाड यांच्या जय भवानी व्यायामशाळेस देखील सढळ हाताने मदत केली आहे. पुणे परिसरातील धार्मिक, सामाजिक , अध्यात्मिक, क्षेत्राला ते भरघोस आर्थिक सहाय्य करत असतात. कोविंड संक्रमण काळात देखील त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
त्यांच्या दोन्ही कन्या उच्च विद्याविभूषित असून त्यादेखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अध्यात्मिक क्षेत्रात अधिकाधिक अभ्यास करत आहेत. धर्मपत्नी सरला या देखील अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यान्च्या विषयी आधिक जाणुन घेण्यासाठी
www.sindhiyat.org
अथवा
tusar.com
ला भेट द्या.
हर्षद रमाकांत गद्रे,उप शिक्षक,मध्य रेल्वे माध्यमीक विद्यालय .मनमाड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here