वैभव चांदे यांनी महाड -पोलादपूर कृषीउत्पन्न बाजार समिती सक्षम करावी – सुरेश पाटील

0

मुंबई : (रवींद्र मालुसरे) वैभव चांदे यांची तरुण वयात बोरावळे ग्रुपग्रामपंचायत सरपंच ते महाड पोलादपूर कृषीउत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ही वाटचाल पोलादपूर वासियांना आत्मीयतेची वाटते आहे, त्यांना मिळालेले हे पद  म्हणजे तालुक्यातील तरुणांना रोजगारांच्या संधी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला घामाचे अधिकचे पैसे देणारी ठरो असे उदगार मुंबईतील शिवसेना विभागप्रमुख आणि नगरसेवक सुरेश पाटील यांनी घाटकोपर येथे काढले. महाड पोलादपूर कृषीउत्पन्न बाजार समितीचे उपसभापती या पदावर वैभव चांदे यांची नुकतीच नियुक्ती झाली त्याबद्दल श्री गावदेवी युवक संघटनेच्या वतीने त्यांचा हृद्य सत्कार आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी पाटील बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे हे होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, वैभव चांदे हे आपले वडील भाई स्व.दिनकर चांदे यांचा राजकीय वारसा चालवत असले तरी, वाडीवस्त्यांवर शेकापच्या माध्यमातून कामे करताना ते राजकीय स्वार्थ न साधता सामाजिक दृष्टीकोनातून विकासकामे करीत आहेत. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणूनच आज पक्षभेद विसरून त्यांच्या सत्काराला आज ही गर्दी एकवटली आहे.  वैभव यांचे वय पहाता ते अशा वळणावर उभे आहेत की, त्यांनी कुठे जायचे, का जायचे, कसे जायचे, किती स्पीडने जायचे आणि कोणते ध्येय गाठायचे आहे हे ठरविण्याचे ही वेळ आणि वय आहे. यापुढची राजकीय कारकीर्द घडवताना त्यांना मेहनत घ्यावी लागेल, काही काळासाठी उसनवारीने पुढे चालावे लागेल, वेळप्रसंगी दुसऱ्याची कॉपी केली, दुसऱ्याच्या काही गोष्टी हिसकावून घेतल्या तरी चालतील. पण दुसऱ्याची वाट घेऊन चालू नये. नाहीतर तो ज्या चुकीच्या ठिकाणी पोहोचला आहे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पश्चातापाची वेळ येईल. ज्येष्ठ सामाजिक नेते आणि शिवसेना घाटकोपर विधानसभा प्रमुख सुभाष पवार, रानवडी गावचे पोलीस पाटील पांडुरंग जाधव, मनसेनेते राज पार्टे, लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर खेडेकर, निलेश कोळस्कर, यांचीही यावेळी वैभव चांदे यांच्या कारकिर्दीचा आढवा घेणारी भाषणे झाली. पोलादपूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन अजित कंक, युवासेना विभागधिकारी अभिषेक मोरे, युवराज साळेकर, राम गुडेकर,  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच निवृत्ती उतेकर, यांनी केले. तर आभार प्रदर्शन विनीत चांदे यांनी केले.
बोरावळे मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय पार्टे आणि सचिव सुभाष उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक  सोपान जाधव, महादेव सकपाळ, सुभाष महाबदी, राजू उतेकर, दगडू महाबदी, रामा पार्टे, पांडुरंग मोरे, रामचंद्र मोरे, शिवाजी कळंबे, दाजी महाबदी, मंगेश कळंबे, भानुदास चांदे, नितेश पवार, नरेश सकपाळ, श्रीधर मोरे, सुशांत चांदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.( रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here