नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार चषक या खेळ मोह्त्सवाचे खासदार डॉ भारतीताई पवार यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला दि २७ मे पासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमाहा समारोप दिनांक ३१ मे रोजी चांदवड येथे मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपूरे व केंद्रीय आरोग्य अव कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या नाशिक कार्यालयाने दिली आहे.
युवक व युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने चषकाचा फिवर शिगेला पोहचला आहे. उन्हाळी सुट्टीत युवक युवतींसाठी खेळ महोत्सवाची पर्वणीच असून सोबत संघ व वैयक्तिकी रोख बक्षिसांची लयलूट होत आहे. खासदार चषक या खेळ मोहत्सवात दिंडोरी लोकसभा मतदार संघात येणाऱ्या दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला या तालुक्यात तालुकास्तरीय स्पर्धा दि २७ मे ते २९ मे दरम्यान घेण्यात येत आहेत. यात क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, कबड्डी या चार खेळांचा समावेश आहे. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघाना १५ हजार तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाला ११ हजार रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे व सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात येणार आहेत. या स्पर्धा सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत.
तालुकास्तरीय स्पर्धा संपल्यानंतर दि ३१ मे रोजी श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचार्याश्रम. चांदवड, ता. चांदवड, जि. नाशिक येथे तालुक्यातील विजयी संघांचे जिल्हास्तरीय सामने सकाळी ७ वाजेपासून घेण्यात येणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या सामन्यात विजयी संघाना ५१ हजार तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाना २१ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणीही वैयक्तिक बक्षिसे व सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात येणार आहेत.
मोबाईलमुळे आजच्या तरुणपिढीचे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक आजारांना घरबसल्या निमंत्रण मिळत आहे. शरीराची हालचाल होत नसल्याने युवकांना हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत. ह्या घटना ग्रामीण भागातही घडू लागल्यानं चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे तालुक्यातील ज्या युवक, युवतींना शाळा महाविद्यालयात खेळात सहभागी होता येत नाही. अशा युवक व युवतींसाठी खासदार चषक उन्हाळी सुट्टीच्या काळात एक पर्वणीच ठरली आहे. अशा स्पर्धा घेणे काळाची गरज आहे.डॉ भारती पवार – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री – राज्यात खासदार चषक स्पर्धा प्रायोगिक तत्वावर घेण्यात आली असून या खेळ महोत्सवाला दिंडोरी लोकसभा मतदार संघातील युवक व युवतींचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याने हा खेळ महोत्सव पुढील वर्षांपासून दिंडोरी लोकसभा खासदार चषक पॅटर्न संपूर्ण राज्यात व नंतर देश पातळीवर राबविण्याचा मानस आहे.