
मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे संत गाडगे महाराज यांची जयंती निमित्त स्वच्छता व अभिवादन करून साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. पवन सिंग परदेशी यांच्या नेतृत्वात एन एस एस स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरातील झाडांना आळे करून रोझ गार्डन ची स्वच्छता केली. त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे यांनी केले. महेश महाले या एन एस एस स्वयंसेवकाने आपल्या मनोगतातून व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवरायांनी या समाजामध्ये पराक्रम शौर्याच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानपूर्ण लेखणीच्या माध्यमातून संविधान निर्माण केले. तर संत गाडगे महाराजांनी समाजातील अज्ञान,भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा इत्यादी दोषांवर स्वच्छता, कीर्तनांद्वारे कठोर प्रहार केले व लोकजागृती केले.संत गाडगेबाबा कुठल्याही शाळा-कॉलेजात गेले नव्हते पण संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यांचे तोंडपाठ होते. गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ होते. समाजातील अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लोक शिक्षणाचा वसा घेतला इत्यादी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या प्रा. ज्योती पालवे,कुलसचिव समाधान केदारे, तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, एनएसएस स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व प्रसिद्धी विभागातर्फे करण्यात आले.
