
मुंबई -दादर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
४५ कलाकारांच्या संचात आपल्या शिस्तबद्ध सादरीकरणाने प्रेक्षकांचे मन रिझवुन टाकणारी आणि प्रत्यक्षात पंढरीच्या वारीचं दर्शन घडविणारी, महाराष्ट्राच्या संत परंपरेवर तसेच त्यापासून सुरू झालेल्या पंढरीच्या वारीची परंपरा आणि वारकरी संप्रदायावर आधारित वारी सोहळा संतांचा ही नृत्यनाटिका नुकतिच सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी, शिवाजी मंदिर, दादर येथे अनुभवायला मिळाली. हा कार्यक्रम, पंढरीच्या वारीची झालेली सुरुवात व नंतर कालांतराने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आपल्या संतांनी हि परंपरा पुढे सुरू ठेवून हा वारसा आपल्या पिढीकडे कसा सोपवला यावर भाष्य करतो. तसेच वारकरी संप्रदाय व त्याला मिळालेली संतांच्या संस्कारांची जोड, शिकवण यावर देखील भाष्य करतो. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत रामदास स्वामी, संत तुकाराम तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची झालेली भेट व त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याला मिळालेली एक वेगळी प्रेरणादायक दिशा हा या कार्यक्रमाचा मूळ गाभा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्राला लाभलेली ही अमूल्य परंपरा हे संस्कार आपली आताची पिढी हे जपतो आहोत का? किंवा ती कशी जपली गेली पाहिजे व आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण हा अमूल्य वारसा त्यांचा हातात कसा सोपवला पाहिजे जेणे करून ही परंपरा हा प्रवास पुढे वर्षानुवर्षे असाच अखंड सुरू राहील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला देव आता या काळात आपल्याला कोणत्या अवतारात भेटणार नसून तो आपल्या प्रत्येक माणसा माणसात शोधला पाहिजे यावर प्रबोधनात्मक भाष्य करतो. कृष्णाई इव्हेंट्स मुंबई प्रस्तुत तसेच चेतन पडवळ आणि सागर जेठवा (प्रो इव्हेंटिस मुबई) यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन ओंकार वसुधा अशोक सावंत यांनी आपल्या संकल्पनेतून उत्तमरीत्या मांडले आहे. साईप्रसाद दळवी यांच्या लेखनाला त्यांनी न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अस्खलित पणे निवेदन स्वर पराग आजगावकर यांनी दिले असून नृत्यरचना अर्चना ओंकार सावंत ओंकार वसुधा अशोक सावंत यांची आहे. प्रकाश योजना
चेतन पडवळ, नेपथ्य राम साग्रे आणि मंडळी, ग्राफिक्स महेश वाडेकर, रंगभूषा राजेश परब, वेशभूषा अर्चना ओंकार सावंत, वेशभूषा सहाय्यक मिलिंद सकपाळ. एकंदरीत काय तर खऱ्या अर्थाने वारीचं दर्शन घ्यायचं असेल तर वारी सोहळा संतांचा हा कार्यक्रम पाहायलाच हवा.
