तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन होताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ ! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सॅनिटायझर देऊन केले स्वागत

0

जळगाव, दि. 12 (जिमाका) – कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेसचे आज सकाळी जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आगमन झाले. त्याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी सॅनिटायझर देवून त्यांनी त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली. दरम्यान, आपल्या गावी सुखरूप पोहचल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. तसेच दोन महिन्यापासुन मुलांच्या भेटीची आस लागलेल्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले.कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तामिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. त्यांना आर्थिक अडचणींसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी व स्वतः विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून अडकलेल्या विद्यार्थ्यांना जळगावात आणण्याची विनंती केली होती. त्यानुसार शासनाकडे सतत पाठपुर करून पालकमंत्री पाटील यांनी सकारात्मक विचार करून ही मागणी पूर्ण केली.
पालकमंत्र्यांनी केला होता पाठपुरावा
6 एप्रिल, 2020 रोजी झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या ऑनलाईन बैठकीतही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यासह जिल्ह्यातील विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तामिळनाडू व केरळ राज्यात अडकलेले असल्याने त्यांना महाराष्ट्रात आणण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली होती. त्यावेळी यावर संबंधितांनी सकारात्मक भूमीका दर्शविली होती.
तामीळनाडू राज्यात जिल्ह्यातील जवळपास 160 विद्यार्थीं अडकले होते. पालकमंत्री पाटील यांचा विद्यार्थ्यांशी थेट संपर्क सुरू होता. दरम्यान मंत्रीमंडळाने परप्रांतीयांना त्यांच्या मुळगावी तर इतर राज्यात अडकलेले नागरिक व विद्यार्थ्यांना आणण्याचा निर्णय घेतला असता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधून जळगाव जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना देखील आणण्यासाठी पाठपुरावा केला. अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यानंतर 160 विद्यार्थ्यांना तामिळनाडू येथून थेट सांगली (मिरज) येथे आणण्यात आले. तेथून बसेसद्वारे जळगावपर्यंत विद्यार्थ्यांना पोहचविण्यात आले.जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आज 160 विद्यार्थ्यांना घेवून सात बसेस दुपारी 12 वाजेच्या सुमारास दाखल झाल्यात. विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेसचे जळगाव बसस्थानकात होताच विद्यार्थ्यांनी एकच आनंद व्यक्त केला. गेल्या दोन महिन्यांपासून परराज्यात अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. मात्र पालकमंत्री पाटील हे आमच्याशी वेळवेळी थेट संपर्क करून दिलासा देत होते. अश्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात. आपण आपल्या गावी आल्याचे पाहून काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ दिसून येत होते तर विद्यार्थ्यांसह त्यांच्या नातेवाईकांनीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सॅनिटायझर देवून स्वतः पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, आगार स्थानक प्रमुख निलीमा बागुल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, राजेंद्र चव्हाण, रमेश पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.
पालकमंत्रीनी प्रशासनाचे मानले आभार !
दरम्यान लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 160 विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, राज्य परिवहन मंडळाचे चालक व कर्मचारी, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांचे सहकार्य मिळाल्याने त्यांचे व शासनाचे पालकमंत्र्यांनी आभार व्यक्त केले आहे. व कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात ‘घरी राहा, सुरक्षित रहा, अनावश्यक बाहेर पडून नका’ असा मोलाचा संदेशही जिल्हावासीयांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here