
भुसावळच्या ग्रामीण ग्रामदानी मंडळाचा प्रेरक उपक्रम!!
17 मे लॉकडाऊनपर्यंत पांथस्थाची करणार क्षुधाशांती!
भुसावळ/विशेाष प्रतिनिधी
भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या ग्रामीण ग्रामदानी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा प्रेरक असा उपक्रम सुरू आहे. कोरोना प्रादुर्भावाने सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई-सुरतवरून येणार्या व मध्य आणि उत्तर भारताकडे पायदळ जाणार्या सुमारे पाचशेच्यावर पांथस्थ वाटसरूंना सकाळी नाष्टा, दुपारी आणि सायंकाळपासून रात्रहोवोस्तर भोजन वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. आठ दिवसांपासून सातत्याने या मंडळाची सेवा अविरत सुरू आहे. सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, रात्रीचे जेवणाचा सुमारे पाचशेहून अधिक पांथस्थ या सेवेचा लाभ घेत आहे.
राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पांडुरंगनाथ नगरमधील ग्रामीण ग्रामदानी बहुउद्देशीय मंडळातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असतात. यात सामाजिक, धार्मिक, उत्सव, गणेशोत्सव, कीर्तन भागवत कथा सप्ताह, पेयजल पाणपोई पायदळ यात्रा आदिंचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन आहे. गुजराथ, मुंबईकडून रोज हजारो नागरिक उत्तर भारताकडे पायदळ कूच करत आहेत. या गावाकडे पायदळ जाणार्यांमध्ये वृध्द, बालके, महिला, गरोदर महिला, आजारी पेशंट, तरूणांचा मोठा भरणा आहे. दरकोस दरमुक्काम अशा बिकट अवस्थेत मजुरांचे रोज हजारोंच्या संख्येने स्थलांतर होत आहे.
अशा गरजवंत पांथस्थांची भूक आणि तहान शमविण्याचे कार्य ग्रामीण ग्रामदानी मंडळातर्फे अव्याहतपणे सुरू आहे. सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर आमले यांच्या प्रेरणा आणि नेतृत्वाखाली मंडळाचे राजेंद्र गुलाबराव पाटील (माजी सरपंच कोचूर), सुपडू तायडे, प्रवीण भावसार, देविदास मावळे, तुकाराम पाटील, आनंदा चिमणकर, सौ. आशाताई पाटील, श्रीमती नंदाताई पाटील, रवींद्रसिंग चौधरी, रमेश ढाके, धनराज ठाकरे, मोहन चौधरी, कमलाकर सातव, संजय सापकर, दुर्गादास सपकाळे, सरजू पटेल, दिलीप साळुंखे, नागेश नेवे, सुशील पाटील आणि या सर्व कार्यकर्त्यांचा परिवार परिश्रम घेत आहे.
सर्व प्रवाशी हायवेनेच गावाकडे सुमारे हजार-हजार दोन-दोन हजार किमीचा पायदळ प्रवास करत असल्याने त्यांना दोन घास खाऊ घालून थकवा शीणभाग दूर करण्याचे कार्य या मंडळातर्फे सुरू असल्याने त्यांचे सर्व कौतुक होत आहे.
