
जामनेर /प्रतिनिधी
कापुस खरेदी सुरु करण्यापुर्वी येथील बाजार समिती बाहेर सोमवारी सकाळ पासुनच शेतकर्यांनी मोठी रांग लावली होती. सकाळी दहा पासुन नोंदणीला सुरुवात झाली. दोन पर्यंत नोंदणी करणार असल्याचे जाहीर झाल्याने गर्दी वाढतच होती. दुपारी दीडच्या सुमारास बाहेर थांबलेल्या शेतकर्यांनी दरवाजा तोडुन आत प्रवेश केल्याने गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली.
गोंधळाची स्थिती पाहुन बाजार समितीने उपस्थीत सर्व शेतकर्यांंचे नोंदणी अर्ज स्विकारले व पुढील आदेशापर्यंत नोंदणी थांबवीत असल्याचे जाहीर केले. या गोंधळात सभापती संजय देशमुख यांना चक्कर आल्याने त्यांना दवाखान्यात हलवावे लागले. एकुणच नोंदणी करतांना सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडाल्याचे दिसुन आले. उपसभापति दीपक चव्हाण, संचालक गणेश महाजन, पदमाकर पाटील, सचिव प्रसाद पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. सुमारे 250 अर्जांची ऑनलाईन नोंदणी झाली असुन 400 हुन अधीक अर्ज स्विकारले गेल्याचे सांगण्यात आले.
शासनाने यापुर्वी सुरु केलेली कापुस खरेदी केंद्र मध्यंतरी बंद झाली. शेतकर्यांच्या घरात कापुस पडलेला असुन तो विकण्याशिवाय पर्याय नाही. खरीप हंगाम तोंडावर आला असुन आर्थीक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना कापुस विकणे गरजेचे आहे. यामुळे शेतकर्यांनी आज सकाळपासुन भर उन्हात नोंदणीसाठी रांगा लावल्या. काही शेतकर्यांच्या गोंधळामुळे नोंदणी थांबल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
