
ओमान : भारत सरकारने आपल्या राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017 मध्ये प्रतिजैविक प्रतिकार विरोधला (AMR) प्राधान्य दिले आहे. प्रतिजैविक प्रतिकार विरोध (AMR) करणारी सर्वसमावेशकपणे प्रणाली तयार करण्याचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.” असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी मस्कत, ओमान येथे प्रतिजैविक प्रतिकार विरोध यावरील तिसऱ्या जागतिक उच्च मंत्रीस्तरीय परिषदेत भारताचे राष्ट्रीय निवेदन सादर करताना सांगितले.अत्याधुनिक स्तरावर सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिजैविक प्रतिकार विरोधाचे प्रभावी नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रतिजैविक प्रतिकार रोखण्यासाठी राज्य कृती योजनांच्या विकास आणि अंमलबजावणीला प्राधान्य देण्याचे भारताचे उदाहरण सर्वोत्तम असून यावर पुढे चर्चा केली जाऊ शकते. इतर देशांनीही या धोरणाचे अनुकरण केले आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
एएमआरच्या प्रतिबंधासाठी राष्ट्रीय कृती योजना एकात्मिक अशा आरोग्य दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करणे ,आणि राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांमध्ये समन्वय साधण्यावर डॉ. भारती पवार यांनी भर दिला.भारताच्या आगामी G20 अध्यक्षपदाच्या वसुधैव कुटुंबकम् ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने एएमआरने उभ्या केलेल्या विकास संबंधी आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्व सरकारे आणि भागीदारांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना केले.
