
नाशिक : सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थातच बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते होते. यावेळी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे मुळे सर, स्नेहा नगरकर, दिक्षा महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, शिक्षक व पालकांनी पूजन करत पंडित जवाहरलाल नेहरु यांना विनम्र अभिवादन केले.
तद्नंतर इ.१ ली ते ८ वी च्या निवडक विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनावर मराठी, हिंदी व इंग्रजीतून भाषणे केली.
तद्नंतर बालदिनाचे औचित्य साधून अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व मनपा शाळा क्र.७१ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, पंडित नेहरू, बाळासाहेब ठाकरे इ. महान व्यक्तींच्या वेशभूषा केल्या होत्या.
इ.६ वी ते ८ वी तील निवडक ३० विद्यार्थ्यांचे सहा गट करुन पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
वेशभूषा व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
बालदिनानिमित्ताने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन इ. ५ वी च्या वर्गशिक्षिका कविता वडघुले व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परित्राण कांबळे व आभारप्रदर्शन कल्याणी राठोड या विद्यार्थ्यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ शिक्षक किसन काळे, शोभा मगर, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, प्रविण गायकवाड यांनी परीश्रम घेतले.
