
नाशिक : सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये “वर्गवार वाचन कोपरा” उपक्रम सुरु करण्यात आला.भ्रमणध्वनी, दूरदर्शन यांसारख्या साधनांमुळे विद्यार्थ्यांचा पुस्तक वाचनाकडे कमी झालेला कल वाढविण्यासाठी तसेच बालपणापासूनच वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी सदर उपक्रम सुरु करीत असल्याचे प्रतिपादन शाळेचे प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी केले.या उपक्रमात शाळेतील प्रत्येक शिक्षकाने स्वतः पुस्तके खरेदी करुन आपल्या वर्गात विद्यार्थ्यांसाठी “वाचन कोपरा” तयार केला. त्यात वयोगटानुसार विविध पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.विशेष म्हणजे शाळेच्या या उपक्रमाने भारावून जाऊन वैभव गोळे या पहिलीच्या पालकाने सदर वर्गासाठी लागलीच २१ पुस्तके वर्गशिक्षिका सुवर्णा थोरात यांच्याकडे भेट दिली.
आपल्या वाढदिवशी चाॅकलेट न वाटता बालवाचनालयास पुस्तकरुपी भेट देण्याचे आवाहन प्र. मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी विद्यार्थ्यांना केल्याने इ.८ वी अ च्या कृष्णा बोराडे या विद्यार्थ्यांने स्वतःच्या वाढदिवशी चाॅकलेट न वाटता शाळेच्या बालवाचनालयास पुस्तकरुपी छान भेट वर्गशिक्षिका रुपाली ठोक यांना दिली.उपक्रम यशस्वी करण्यासाठी किसन काळे, विनोद मेणे, प्रमिला देवरे, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, कविता वडघुले, वर्षा सुंठवाल, शोभा मगर, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, प्रविण गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
