लडाखमध्ये जो तणाव आहे, त्यामुळे चीनबरोबर लागून असलेल्या सीमारेषेवर अन्य परिस्थिती बिघडू शकते असे अधिकाऱ्याने सांगितले. पॅनगाँग टीएसओ तलावाच्या भागात गस्तीसाठी चीनकडे आधी फक्त तीन नौका होत्या. आता ही संख्या तिप्पट झाली आहे. तलावाच्या ४५ किलोमीटरच्या पश्चिम भागावर भारताचे नियंत्रण आहे. या भागात गस्त घालण्यासाठी भारताकडे सुद्धा चीन इतक्याच नौका आहेत. पॅनगाँग टीएसओ तलावाच्या भागात चीनने फक्त नौकांची संख्या वाढवलेली नाही तर गस्त घालताना सुद्धा ते आक्रमकता दाखवत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.भारताकडून लडाखमध्ये सुरु असलेल्या रस्ता बांधणीवरही चीनने आक्षेप घेतला आहे. ‘हो, तणाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही आमच्या भागामध्ये बांधकाम करत आहोत. जेव्हा चिनी सैनिक जबरदस्ती घुसखोरी करतात आणि आमच्या सैनिकांकडून त्यांना माघारी फिरण्यास सांगण्यात येते, तेव्हा स्वत:हून ते माघारी फिरत नाहीत. त्यामुळे संघर्षाची स्थिती उत्पन्न होते’, असे सूत्रांनी सांगितले.
लडाखमध्ये अतिरिक्त सैन्य तुकड्या तैनात
सीमा भागात नेहमीच आपले वर्चस्व दाखवण्याचा चीनचा प्रयत्न असतो. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून लडाखमध्ये भारतीय सैन्याने अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत. सीमावाद कायम असलेल्या पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये भारत आणि चीन दोघांनी अतिरिक्त सैन्य तुकड्या तैनात केल्या आहेत. पाच-सहा मे रोजी पॅनगाँग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैनिक परस्परांना भिडले होते. यापूर्वी सुद्धा या भागामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत.