खाकी वर्दीतील दिलीप जाधव यांच्या माणुसकीचे मनोज्ञ दर्शन

0

महाड : पोलिस वा ‘खाकी वर्दी’ म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्या समोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकाऱ्याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने प्रसंगी मदत करतात, सल्ला देतात, पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं . खाकी वर्दीतील देव माणूस हे वाक्य साजेल व पोलीस दलाची मान उंचावेल असे काम सध्या ठाणे येथे राहणारे परंतु मूळचे महाड तालुक्यातील किंजळोली – भालेकर कोंड या गावातील निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप महादेव जाधव यांनी केले आहे.माणुसकीचे दर्शन घडविणारी ही घटना पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील रिंगेवाडी येथे घडली आहे. २२ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये साखर गावातील सुतारवाडीवर दरड कोसळली, त्यात संपूर्ण वाडी उध्वस्त होताना ६ मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. यातील एका निकटच्या घरात सौ सुनीता विठ्ठल चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईमध्ये घरकाम करून व पै पै पुंजी जमवून काही दागिने बनवले होते, दागिन्यांचा तो डबा पुरात वाहून गेला. मुलीचे लग्न तर पुढच्या वर्षी करण्याचे ठरले होते. त्यात पूजाचे वडील विठ्ठल चव्हाण हे अपंग आणि निराधार. त्यामुळे या कुटुंबासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.पोलादपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार यांनी महाड येथील तळिये आणि पोलादपूर तालुक्यातील साखर-सुतारवाडी व केवनाळे गावातील पूरपरिस्थीचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मिटिंग आयोजित केली होती. सभेला सुरुवात करताना मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी महाड पोलादपूरमध्ये आलेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन कसे विस्कळीत होऊन जीवित व वित्तहानी झाली आहे याचा संपूर्ण आढावा घेत केवनाळे येथील ११ वर्षीय साक्षी दाभेकर दिड वर्षाच्या मुलाला वाचवताना पाय गमावून बसली आहे तर साखर येथील पूजा चव्हाण हिचे लग्नाचे दागिने वाहून गेल्याचे सभेत आपल्या भाषणात सांगितले.  त्याचवेळी दिलीप जाधव यांनी मालुसरे यांना जवळ बोलावून पूजाच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे आणि या गोष्टीची कोणाकडेही वाच्यता करू नये असे सांगितले. दागदागिने कपड्यालत्यासह सर्व खर्चाची जबाबदारी घेत जाधव साहेबांनी आश्वासनाची पूर्तता करीत पूजाचे लग्न नुकतेच विष्णू सीताराम गोगावले यांच्याशी साखर येथे करून दिले.यानिमित्ताने  खाकी वर्दीतील माणुसकीचा चेहरा दिलीप जाधव यांच्या रूपाने समोर आला आहे.  महाराष्ट्र नशीबवान आहे. प्रशासनात आजही असे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं माणूसपण सुटलेलं नाही. जे तरूण मित्र एमपीएससी, आयएएस होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी अशी गोष्ट कायम स्मरणात ठेवावी आणि अशाच पद्धतीने खास होऊनही आम राहावे.सामाजिक भावनेतून त्यांनी केलेल्या या कामाबद्दल जाधव यांना जेव्हा विचारले तेव्हा ते म्हणाले की, मी फक्त माझं कर्तव्य केलं…वेगळं काहीच नाही.”  पोलिसांना जात नसते ना धर्म असतो. लोकांचं रक्षण, त्यांच्या मदतीला धावणे हाच त्यांचा खरा धर्म असतो.  त्यामुळे मानवता हा एकच धर्म मी मानतो. लहानपणी अनुभवलेली गरिबी आणि उदरनिर्वाहासाठी आईसोबत केलेले कष्ट याचे स्मरण मला अजूनही आहे. समाजात आपल्या हातून चांगले कार्य घडावे हीच अपेक्षा व जाणीव ठेवून मी माझ्या जन्मगावात आणि समाजात काम करीत असतो. शाळेत आम्हाला प्रार्थना होती. ‘खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे’ आम्ही रोज ही प्रार्थना म्हणायचो. लोकांनी ही प्रार्थना लक्षात ठेऊन काम केलं पाहिजे. सर्वधर्म समभावाने राहिलं पाहिजे.  “जात, धर्म महत्त्वाचा नाही. माणसाने, माणसासाठी माणसासारखं वागलं पाहिजे.पूजा व विष्णू शुभेच्छा देण्यासाठी महाड-पोलादपूर तालुक्यातील महाड तालुका शिवसेनाप्रमुख सुरेश महाडिक,  शिवसेना महाड संपर्क प्रमुख सुभाष पवार, पोलादपूर तालुका निलेश अहिरे, नाईक मराठा समाज अध्यक्ष सुनील मोरे, उद्योजक संजय उतेकर, उद्योजक विनोद पवार, महाड सहसंपर्क प्रमुख विजय सावंत, रायगड जिल्हा बँक साखर विभाग सोसायटीचे अध्यक्ष नारायण कळंबे, प्रमोद गोगावले, भरत चोरगे, नारायण चोरगे गुरुजी, महाड संपर्क प्रमुख बंधू तरडे, नाईक मराठा समाज महाड नाते विभाग अध्यक्ष बापू तथा आबा डोंबे, तुकाराम केसरकर, रामदास कळंबे, यांच्यासह शेकडो स्त्री-पुरुष नागरिक उपस्थित होते. दिलीप जाधव यांच्या खाकी वर्दीतील माणुसकीचे मनोज्ञ दर्शन समाजसेवकांच्या रूपात दिसून आल्याने समाजातल्या या सुपुत्राच्या कार्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here