प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील (वच्ची) यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून जाहीर सत्कार.

0

मुंबई-दादर-प्रतिनिधी: भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे (नॅशनल पोस्टल वीक) दिनांक ११ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झालेल्या सोहळ्यात भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई तर्फे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील यांना त्यांच्याच छायाचित्रचे (MY STAMP) टपाल तिकीट प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी बी. एस. पठारे (प्रवरअधिक्षक डाकघर मुंबई पूर्व विभाग), सुभाष परब (वरिष्ठ डाकपाल, दादर हेड पोस्ट ऑफीस), भालचंद्र सुतार (डेप्युटी पोस्टमास्तर दादर हेड पोस्ट ऑफीस) आणि विलास (बाळा) चौकेकर (जनसंपर्क अधिकारी दादर हेड पोस्ट ऑफीस आदी कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते. संजीवनी पाटील यांनी आपल्या करियर ची सुरुवात राज्य नाट्य स्पर्धा ते कामगार नाट्य स्पर्धातून केली. त्याचबरोबर एकांकिका, दिर्घांक आणि व्यावसायिक नाटकांतून आपल्या अभिनयाची झलक दाखविली. पटली तर बायको हे त्यांचे विशेष गाजलेले नाटक. आपल्या अभिनयाच्या जोरावर जोधा अकबर, कुमकुम भाग्य, ये है मोहोब्बते आणि मेरे साई आणि मराठी मालिका जय जय स्वामी समर्थ, जयोस्तुते, जय मल्हार, तुझं माझं ब्रेकअप आणि रात्रीस खेळ चाले अशा अनेक हिंदी- मराठी मालिका केल्या. त्यात झी वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या रात्रीस खेळ चाले (पार्ट २) या रहस्यमय मालिकेतील वच्ची ही त्यांची व्यक्तिरेखा विशेष गाजली. झी मराठी वाहिनीने २०१९ साली त्यांच्या वच्ची या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देखील प्रदान केला आहे. मालिकेबरोबर त्यांनी ये रे ये रे पैसा, रंगीला रायबा, लालबागची राणी, हसली तर फसली या सिनेमात अभिनय केला आहे. संजीवनी पाटील यांनी सिने-नाट्य रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती म्हणुन भारतीय टपाल विभागाने त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीट (MY STAMP) प्रसिद्ध करून त्यांचा योग्य तो सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मुंबई-महाराष्ट्रात विशेष कौतुक होत आहे.( धन्यवाद, विलास (बाळा) चौकेकर,जनसंपर्क,अधिकारी,भारतीय टपाल विभाग
दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here