विज्ञाननिष्ठा आणि आत्मनिष्ठा यांचा सुरेख संगम सावरकरां पाशी झाला होता – सौ. वैष्णवी परकाळे

0

मुंबई – मराठी भाषा संवर्धन समिती आयोजित सौ. शलाका काळकर सौ. सुनीता गोळे यांच्या संकल्पनेतून दि. २२ मे २०२१ रोजी साकारलेल्या आंतरजाल वसंत व्याख्यानमालेत समारोपाचे सहावे पुष्प सावरकरांचे द्रष्टेपण या विषयावर सौ. वैष्णवी वीरेंद्र परकाळे यांनी ओघवत्या व परखड भाषेमध्ये सावरकरांचे विचार मांडले. सावरकरांचे द्रष्टेपण ,हिंदुत्वाची संकल्पना,आत्मसमर्पणाची भावना, त्यांचे देशावरचे प्रेम, अतोनात निष्ठा परखड आवेशपूर्ण भाषेमध्ये मांडून मा. वैष्णवी यांनी श्रोत्याच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष सावरकरच उभे केले.मराठी भाषा संवर्धन समितीचे ब्रीदवाक्य ” मराठी असे आमुची खास, तिचा विकास हाच आमचा ध्यास ” या वाक्याच्या अनुषंगाने भाषा शुद्धी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते एकमेवाद्वितीय भारतरत्न विनायक दामोदर सावरकर. सावरकरांनी आपलं सगळं आयुष्य, बॅरिस्टर ही पदवी, आपली पत्नी, आपला एकुलता एक मुलगा,आपले सर्व साहित्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी बहाल केलंय. त्यामुळे ते भारतरत्न. आपण स्वतःला भाग्यशाली म्हटलं पाहिजे ज्या जन्मभूमीत हे भारतरत्न जन्मले तीच जन्मभूमी आपली मायभूमी आहे. अंदमानमध्ये सावरकरांच्या हालाचे झालेले वर्णन त्यांनी आपल्या भाषणात केले. खरा इतिहास शिकायचा असेल तर त्यातली सोनेरी पानांची ओळख झाली पाहिजे. इतिहासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.सावरकरांची विज्ञाननिष्ठा आढळ होती विज्ञाननिष्ठा व आत्मनिष्ठा यांचा सुरेख संगम सावरकरांपाशी झाला होता. देह आणि देव यामध्ये देश असतो हे त्यांनी जाणले, म्हणून आपले अवघे आयुष्य देशासाठी समर्पित केले. “अनादी मी अवध्य मी “असे सावरकरांनी मृत्यूला खडसावून सांगितले होते. येत्या २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंती साठी त्यांनी ही त्यांची शब्द सुमने अर्पित केली आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमधुर आवाजात सौ सुनिता गोळे यांनी गुंफले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री पंकज पाटील यांनी केले. सौ वैष्णवी वीरेंद्र परकाळे यांचा परिचय सौ संगीता पाताडे यांनी ओघवत्या शब्दात करून दिला मराठी भाषा संवर्धन समितीचे मार्गदर्शक मा.अनुजा चव्हाण मॅडम व मा. सतीश चिंदरकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व समारोप सौ.शलाका काळकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here