उद्या विवेक पाटीलही निर्दोष सुटू शकतात

0

मुंबई – कांतीलाल कडू : कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 529 कोटीचा घोटाळा झाल्याप्रकरणी सहकार खाते आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशी सुरू आहे. चौकशी म्हणजे कागदांचा खेळ आहे, असे दिसते. लहान मुलं कागदाची होडी करून पावसाच्या पाण्यात सोडतात, तशी प्रक्रिया दोन्ही खात्यांकडून सुरू ठेवली आहे. ‘नरो वा कुंजरो’च्या भूमिकेत सीआयडी आणि भ्रष्टाचाराने पोखरलेले सहकार खाते आहे. सत्ताधारी बदलले की, नवरा बदलतो तशी त्यांच्या संसाराची पद्धतही बदलते. त्यातून कुणाला न्याय मिळतो, कुणावर अन्याय होतो. तसे सहकार खात्याच्या ठाणे उपजिल्हा निबंधक विशाल जाधववर यांनी केले आहे. एका झटक्यात 38 संशयितांपैंकी 18 जणांची चौकशीच टाळली आणि त्यांना दोषमुक्त करून मोकळे झाले. अशा पद्धतीने न्यायववस्थेचे वर्तन असेल तर उद्या कर्नाळा बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी विवेक पाटील हे निर्दोष सुटले तर कुणाला आश्‍चर्य वाटायला नको. न्याय अशा पद्धतीने मिळत असेल तर तेसुद्धा सहज खिशात घालू शकतात. मग मरतील ते खातेदार, ठेविदार.विशाल जाधववर यांनी सहकार खात्याच्या कायद्याचा आधार म्हणे, ऑडिट कालावधीच्या पाच वर्षापेक्षा मागे जावून तपास करता येत नसल्याची पळवाट शोधून चक्क 18 जणांना ‘क्लिन चिट’ दिली. जिथे तपासच केला नाही किंवा कुणी तरी कदाचित करूच दिला नाही, तिथे ‘क्लिन चिट’चा प्रश्‍नच येत नाही. यालाच कदाचित भौतिक भाषेत ‘व्यवहार’ म्हणत असतील.सहकार खात्याचे नियम, कायदे जाणणारे उपनिबंधक विशाल जाधववर यांचा अभ्यास तोकडा आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. लेखा परिक्षकांनी 266 पानांच्या कर्नाळा घोटाळा प्रकरणातील त्रुटी आणि घोटाळ्याचा स्पष्ट अहवाल सादर केल्यानंतरही कायद्यालाच फाटे फोडून पळवाटा शोधण्यासाठी आणखी आर्थिक घोटाळे करून न्यायाचा गळाघोट घ्यायचा असेल तर ती न्याय प्रक्रिया तरी कशाला हवी? इतकेच होते तर मग सुरूवातीपासूनच्या संचालकांना गोवून तपासाचा फार्स तरी कशासाठी केला? कशासाठी त्यांच्यावर दोषारोप ठेवायचे?, कशासाठी त्यांना मालमत्तेवर निवाड्यापूर्वीची जप्ती नोटिस काढली ? आणि कशासाठी दोन वर्षाचा तपास कालावधी असताना 15 दिवसात ‘क्लिन चिट’ देवून मोकळे झाले? यात काळंबेरं झाले आहे, हे सांगायला सहकार तज्ज्ञांची गरज नाही.जाधववर यांनी 38 संचालकांकडे दोषांचे अंगुर्लीनिर्देश करून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी जाळे फेकले. त्यामुळे सीआयडी जागे झाले. सहकार खात्याने जप्ती आणली तर आपल्याला काही कारवाईला उरणार नाही, म्हणून त्यांनीही रातोरात गाड्या मागवून घेतल्या. त्यापैंकी तिघांची वाहने त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. पण, त्यांच्या या कारवाईने खर्‍या गुन्हेगारांचीही हवा निघून गेली. आयुष्यभर चोरी, लांडी, लबाडी करून ऐश्वर्याचा शिखर उभा केला आहे, तो कारवाई झाल्यास ढासळेल, या भीतीने मन कातरले आणि त्यांनी साम, दाम, दंड, भेद विसरून कंबर कसली.सहकार खात्याने अक्कल गहाण ठेवल्यानेच मालमत्ता जप्तीची नोटिस बजावली होती, असे मानू. 38 जणांची मालमत्ता काही केली तरी जप्त होणार आणि मगच तपास सुरू होईल. त्यानंतर दोषारोपपत्र ठेवण्यात येईल, असे जाधववर सांगत होते. मग, अचानक त्यांच्या पारड्यात कोणते तुळशीपत्र पडले आणि 15 दिवसाच्या आत प्रकरणाला तिलांजली देत 18 जणांची चौकशीतून मुक्तता केली? त्यानंतर आकड्यांचा खेळही खेळला. अहो, दंडात्मक दोषारोप ठेवण्यापूर्वी त्यांची तेवढी मालमत्ता तरी जप्त केलीत का? अशा प्रकारे न्याय व्यवस्थेची विल्हेवाट लागत असेल तर न्यायालयाची ही दालने अरबी समुद्रात बुडविली पाहिजेत.लेखा परिक्षक यु. डी. तुपे यांनी दिलेल्या अहवालात एका ठेकेदाराला कोट्यवधी रूपयांचे कर्ज देताना त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे तारण अथवा कामाची वर्क ऑडर किंवा महत्वाची कागदपत्रे सुद्धा घेतली गेली नाहीत, अशा तर्‍हेने कर्जाची खिरापत वाटण्यात आली आहे. ते महाशयसुद्धा 18 जणांमध्ये मुक्ततेच्या शुंखलेचा नाद करत आहेत. एक मात्र खरे की, उघडकीस आलेला घोटाळा 2018-19 मध्ये झालेला आहे. पण घोटाळा करून ती दडपल्याची शेकडो प्रकरणे बँकेत सुरूवातीपासून घडली आहेत. त्याचे पाप अनेकांना खात होते. त्यातून मुक्ती मिळाल्याचा आनंद काहींना होत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे.बँकेच्या पैशावर शेकापत असलेल्या पहिल्या फळीतील प्रत्येक नेत्याने तेव्हा डल्ला मारला आहे. त्यातून ही आर्थिक सुबत्ता साधली आहे. म्हणजे ठेविदारांच्या पैशाची लुट करणारे वाल्या कोळी स्वतःला जर आज वाल्मिकी समजत असतील तर काहीच हरकत नाही. पण असा न्याय मिळवण्यासाठी सुद्धा हल्ली म्हणे खोर्‍याने पैसा ओतावा लागतो. तो ओतताना कमरेवरची चड्डी गुडघ्यापर्यंत कशी उतरते, हे ज्याचे त्याला ठावूक. पावसाचे चार-दोन थेंब अंगावर पडलेल्या मोराचा पार्श्‍वभाग उघडा पडलेला असतो, हे त्याला मात्र ठावूक नसते, तशी काहीशी परिस्थिती या प्रकरणी झाली आहे आणि म्हणून असेच चालत राहिले तर उद्या विवेक पाटीलसुद्धा निर्दोष सुटतील. तेव्हा हे विधात्या तूच सांग, ठेविदारांनी अंगाला भस्म फासून हिमालयावर जावे की, मृतांचा खच पडलेल्या गंगेत स्वतःला झोकून देत कडेलोट करून घ्यावा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here