सामाजिक बांधिलकी जपत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य

0

मालेगाव – मालेगांव तालुक्यातील 53 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबास सामाजिक बांधिलकीतून तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमाचे इतर सामाजिक संस्थांनी देखील अनुकरण करावे असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.उभारी कार्यक्रमातंर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने खरीप 2021 करिता मोफत बियाणे, खते, किटकनाशकांचा मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम* आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, संजय दुसाणे, प्रातांधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, विनोद वाघ, भगवान मालपुरे, अशोक देसले, अनिल निकम, अविनाश निकम, दिलीप मालपुरे, बाळासाहेब शिरसाठ, संदय दशपुते आदि उपस्थित होते.शेतकरी आत्महत्या ही घटना अत्यंत दु:ख दायक व क्लेष दायक आहे. कोरोनाच्या संकटात त्यांच्या कुटूंबास खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या माध्यमातून नियमीतपणे दरवर्षी अशा कुटूंबाना अल्पशी मदत देवून दिलासा देण्याचे काम अविरतपणे सुरू असते. सामाजिक बांधिलकीतून करण्यात येणाऱ्या मदतीचे इतर सामाजिक संस्थांनी देखील अनुकरण करून मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात टेहरे येथील कै.बापू शेवाळे यांच्या पत्नि संगीता शेवाळे तर खडकी येथील कै.संदीप शेळके यांच्या आई निंबाबाई शेळके या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबास मदतीचे वाटप करण्यात आले. इतर सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरपोच ही मदत पुरविण्यात येणार असल्याचे ॲग्रो डिलर्सच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर देवून रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करावा. खताच्या वाढत्या दराबाबर शासन संवेदनशिल असून त्या आवाक्यात राहण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे सांगत, खरीप हंगामाच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या खतांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या वर्षापासून खरीप हंगामाचे ग्रामपातळीवर सुक्ष्म नियोजन करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.पुढे बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून ही चिंतेची बाब आहे. लक्षणे दिसताच तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घेवून आरोग्य प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले. प्रतिबंधात्मक आदेशातून शेतीशी निगडीत सर्व कामकाजांना मुभा देण्यात आली असून अडचणी आल्यास प्रशासनासह आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here