संघर्ष समितीच्या रेट्याने अखेर सिडकोचा पाळणा हलला

0

पनवेल: पनवेल महापालिका आणि सिडको महामंडळ प्रशासनातील सुप्त वाद कागदावर रंगल्याने प्रस्तावित जम्बो कोविड हॉस्पिटल गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ हेलकावे खात होते. पनवेल संघर्ष समितीने सिडको अधिकाऱ्यांना महापालिका आणि विधानसभा क्षेत्रात फिरकू देणार नसल्याचा इशारा देताच अवघ्या 15 दिवसात हॉस्पिटलचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.कोविडच्या पहिल्या लाटेत सिडकोने मुलुंड आणि वाशी येथे कोविड हॉस्पिटल उघडल्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि विशेषतः पनवेलवासियांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कोविडच्या प्रारंभीच पनवेल संघर्ष समितीने महापालिकेला सिडकोने दहा कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी करणारे पत्र दिले होते. तर दैनिक निर्भीड लेखमधून ‘वेश्येला मणिहार’, अशा आशयाच्या अग्रलेखातून कांतीलाल कडू यांनी सिडकोचा खरपूस समाचारही घेतला होता.चोहीबाजूने सिडकोवर टीकास्त्राचा मारा झाल्यानंतर अखेर नगर विकास खात्याने सिडकोला आदेश दिले. त्यानुसार सिडकोने महापालिकेशी संवाद सुरू केला. मग जागेची पाहणी आणि उपलब्धता याभोवती महिना-दोन महिन्यांचा कालावधी वाया गेला. त्यात स्थानिक राजकीय नेत्यांनी ‘पी हळद आणि हो गोरी’, असे नाटक वठवले. मग आठवड्यात हॉस्पिटल सुरू होणार असल्याच्या बातम्यांना आपोआप कोंब फुटू लागले. मात्र, हॉस्पिटल काही होईना आणि कोरोनाही आटोक्यात येईना. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
त्यानंतर महापालिका आणि सिडकोच्या सहमतीने कळंबोली येथे 5 कोटी रूपये खर्च करून कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. त्यामध्ये 12 आयसीयु बेड, 60 खाटा ऑक्सिजन असे हॉस्पिटलमधील संरचना आहे. परंतु, पनवेल महापालिकेने कागदांवर रांगोळी काढून सिडकोला ‘दे धरणी ठाय’ केले.
दोन्ही प्रशासनाच्या कात्रीत कळंबोली हॉस्पिटल अडकल्याने ते सुरू होण्याची शक्यता धुसर झाली. त्यात महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख यांनी हॉस्पिटलवरून जाहीर कार्यक्रमातून सिडकोवर तोंडसुख घेतल्याने हॉस्पिटल अधिक गोत्यात अडकले.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सिडकोच्या मर्मावर घाव घालून 8 दिवसात हॉस्पिटल सुरू न केल्यास सिडको अधिकाऱ्यांना पनवेल महापालिका क्षेत्रासह विधानसभा मतदार संघात फिरकू देणार नसल्याचा लेखी इशाराच दिला. त्या पत्राच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह, नगरविकास मंत्री, मुख्य सचिवांना दिल्यानंतर सिडकोचा हत्ती हळुहळु पुढे सरकायला लागला.महापालिकेला हवी असलेली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सिडकोने 15 दिवस लावले. दरम्यान, कडू यांनी दोन वेळा सिडकोचे विमानतळ विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र धायाटकर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बावस्कर यांच्याकडे बैठक घेतली. त्याशिवाय उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्याकडे कैफियत मांडून ताकदीने हॉस्पिटलचे हस्तांतरण करून घेतले आहे.त्याप्रमाणे धायाटकर, डॉ. बावस्कर आणि महापालिकेचे मुख्य शहर अभियंता संजय कटेकर, विभागीय अभियंता सुधीर साळुंखे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वसाहत अधिकारी जयराम पादीर आदींच्या उपस्थितीत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली.आता पाळण्याची दोरी महापालिकेच्या हाती,रखडलेल्या कोविड हॉस्पिटलचे बाळंतपण पनवेल संघर्ष समितीने अतिशय कुशलपणे करून घेतल्यानंतर आता संगोपनाची जबाबदारी पनवेल महापालिका प्रशासनावर आहे. येत्या आठवडाभरात डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची टीम प्रत्यक्षात कार्यरत होईल आणि कोविड रुग्णांच्या सेवेत हॉस्पिटल रुजू होईल अशी माहिती वैद्यकीय विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी आपल्याला दिली आहे. सिडकोप्रमाणेच आता महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
– कांतीलाल कडू- अध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here