वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे : कोरोना संक्रमण काळात लॉक डाऊन मुळे अनेक प्रवासी रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या . परंतु लॉक डाऊन हटवल्या नंतर ही कोरोना संक्रमणाचा धोका बघता फक्त कोव्हीड स्पेशल रेल्वेच धावत आहेत . त्या ठराविक स्टेशन वरच थांबत असल्याने अन्य स्टेशनवरच्या प्रवाशांना रेल्वे थांबा नसल्याने प्रवासासाठी गैरसोयीचे होत होते . मनमाड हे रेल्वे चे जंक्शन असून ते मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तिथून रोज नासिक ,मुंबई प्रवास करणारे असंख्य सरकारी कर्मचारी ,खाजगी कर्मचारी, व्यापारी ,विद्यार्थी यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना प्रवासासाठी फक्त रेल्वेच्या सुविधेवरच अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. चाकरमान्यांना गोदावरी एक्सप्रेस ही अतिशय सोयीची असल्याने ती त्वरित सुरू करावी तसेच नांदगाव येथेही प्रवाशांची संख्या अधिक असल्याने तेथेही प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने नांदगावलाही तेथून जाणाऱ्या गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी खा डॉ. भारती पवार यांनी केंद्रिय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचेकडे पत्राद्वारे केली आहे . ह्या संदर्भात आपण योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊन पुन्हा रेल्वे सेवा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी खा .डॉ .भारती पवार यांना दिले.