मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कोविड योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही! पनवेल संघर्ष समितीच्या कोविड संजीवनी पुरस्कार सोहळ्यात. आदितीताई तटकरेंची ग्वाही

0

मुंबई – पनवेल/प्रतिनिधीःराज्यात महाविकास आघाडी सरकारने विविध खात्यांना आर्थिक बळ देत महत्वाचे प्रकल्प हाती घेण्याचा निर्धार केला होता. त्याच काळात अधिवेशन सुरू होते. नव्या सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय घोषित करून काम हाती घेतले असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. अधिवेशन थांबवावे लागले. त्याही स्थितीत जागतिक स्तरावर अचानक उद्भवलेल्या कोविडचा सामना करत राज्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अत्यंत कुशलतेने प्रशासनाच्या सहकार्याने परिस्थिती हाताळून आटोक्यात आणली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कोविड योगदान विसरता येणार नाही, असे गौरोद्गार राज्याच्या उद्योग, खनिजकर्म, पर्यटन, राजशिष्टाचार राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी काढले.
पनवेल संघर्ष समितीने त्यांच्या शुभहस्ते 200 कोविड योद्ध्यांना कोविड संजीवनी पुरस्कार देवून ज्येष्ठ नागरिक सभागृहात सन्मानित केले. यानिमित्ताने महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू समारंभाचे आयोजनही केले होते. त्यावेळी त्या बोलत होेत्या.पनवेलमध्ये कोरोनाकाळात पनवेल आरोग्य विभाग, महापालिका प्रशासनासोबत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी अतुलनिय कार्य केले आहे. रात्री-अपरात्री त्यांचा फोन येत असे, अशी ग्वाही देवून कोणत्याही कोविड रूग्णाला काही सहकार्य हवे असल्यास ते माझ्याशी बोलायचे, मग ते मी आणि महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख समन्वय साधून पनवेलसाठी काही उपाययोजना, आरोग्यसुविधा पुरविण्याचे कार्य केले जात होते, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.राज्यात नव्यानेच मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्याकडील बहुतेक खात्यांसाठी कधी नव्हे तेवढा निधी मंजुर केला होता. त्यामुळे काम करण्याची नवी उर्जा मिळाली. परंतु, त्याच काळात नेमकी कोरोनाने डाव साधायला सुरूवात केली. त्यावर मात करत राज्य सरकारने महाराष्ट्राची विस्कटू पाहणारी घडी व्यवस्थित बसविण्यासाठी भगिरथ प्रयत्न केले, ते राज्याने आणि संपूर्ण देशाने पाहिले. आपल्या सरकारचे काही राज्याने कोविडबाबतीत अनुकरणही केले, ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची कार्यशैली मानावी लागेल, असे आदितीताईंनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले.आ. बाळाराम पाटील, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रशांत पाटील, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, डॉ. नागनाथ येमपल्ले, डॉ. स्वाती नाईक, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांची कोविड संजीवनी पुरस्कार प्राप्त योद्ध्यांचा यथोचित गौरव करणारी भाषणे झाली. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, व्यासपिठावर तहसीलदार विजय तळेकर, डॉ. बसवराज लोहारे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साळस्कर, फारूखशेठ, भरत जाधव, नेटके आदी मान्यवर उपस्थित होते.भास्करराव चव्हाण, मल्लीनाथ गायकवाड, भास्कर भोईर, आशा चिमणकर, शैला म्हात्रे, राजेश्‍वरी बांदेकर, शुभांगी लखपती, संतोष शुक्ला, मम्मी नायक, प्रमिला पाटील, सीमा नायक, रमेश गोवारी, योगेश पगडे, सुनील भोईर, सचिन पाटील, हर्षल पाटील, किरण करावकर, महेंद्र पाटील, मंगल भारवाड, विजय कलोते, भूषण साळुखे, दर्शन ठोंबरे, स्वप्निल म्हात्रे आदींनी पाहुण्याचे स्वागत केले. सुत्रसंचालन तुळशीदास राठोड यांनी तर आभार अभिजित पुळेकर यांनी मानले.
ना. तटकरेंची मिश्किल टिप्पणी आणि सभागृहात टाळ्यांची चमकली विज!……………………………………………………………………………
कोविड काळातून आपण सारे जात असताना सरकारी आणि व्यक्तीगत स्वतरावर सामाजित क्षेत्रानेही भरीव योगदान दिले आहे. अतिशय विचित्र परिस्थितीचा सामना करत असताना त्यातल्या त्यात आनंदाची जर काही बाब नोंदवावी लागली तर ते कांतीलालशेठ यांचा बदललेला लुक मानावा लागेल. त्यांनी दाढी वाढवली आहे, केस वाढविले आहे. चेहरा मोहराच बदलला आहे. आता त्यांची वाढती दाढी पाहून ते दिल्लीशी तर स्पर्धा करत नाहीत ना, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळत मिश्‍लिक टिप्पणी करताच सभागृहात कित्येक वेळ टाळ्यांच्या विजा चमकत होत्या. आदितीताईंच्या एकंदर भाषणाची शैली पाहून खा. सुनील तटकरे यांच्या भाषणाचा त्यांच्यावर असलेला प्रभावही अनेकांनी अनुभवला.पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते सत्कार केल्याची व्यक्त केली कृतज्ञता……………………………………………………………………………महाराष्ट्राचे भावगंर्धव पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते खारघर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कांतीलाल प्रतिष्ठानच्या वतीने कांतीभाईंनी माझा गौरव जाहिर सांस्कृतिक कार्यक्रमातून केला होता. तो क्षण आजही हृदयाच्या कोपर्‍यात जपून ठेवला आहे. तेव्हा मी पुरस्कार घेणार्‍यांच्या यादीत होते. त्यांच कांतीभाईंच्या कार्यक्रमात आज माझ्या हस्ते कोविड संजिवनी पुरस्कार देण्याचा योग त्यांनी जुळवून आणला आहे, असे हृदयस्पर्शी भावोद्गार आदितीताई तटकरे यांनी काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी यावेळी महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख आणि कांतीलाल कडू यांच्या कोविड काळातील दूरावलेल्या संबंधांवर नाजूकपणे टिप्पणी करून मैत्रीचा पुन्हा सेतू उभारला गेल्याने आनंद होत असल्याचे जाहिरपणे सांगताच, सभागृहात आनंदाचे कारंजे फुलले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here