
पनवेल – फडणवीस सरकारने 2018 मध्ये मंजूर केलेल्या काळुंद्रे-शिवकर मार्गाला ग्रहण लागले होते. पनवेल संघर्ष समितीने रेटा लावून 19 कोटीच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ करण्यास एमएमआरडीएला प्रवृत्त केले. त्यामुळे कामाला सुरुवात झाल्याने काळुंद्रे विभागातील त्रस्त नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
साडेतीन किलो मीटर लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण शांतीलाल नावाचे ठेकेदार करत आहेत. त्या कामाची पाहणी करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी एमएमआरडीएचे अभियंता लोकेश चौसष्टे यांच्यासह भेट दिली. त्यांच्या विभागाचे अधिकारी, ठेकेदार या प्रसंगी उपस्थित होते. संघर्ष समितीचे काळुंद्रे विभागीय अध्यक्ष भास्कर भोईर, महिला तालुका अध्यक्ष डॉ. अनघा रामाणे, उपाध्यक्ष प्रा. चित्रा देशमुख, नवीन पनवेल अध्यक्ष अभिजित पुळेकर, महिला शहर अध्यक्ष निकिता जोशी, उपाध्यक्ष राजेश्वरी बांदेकर, नेरे विभागीय अध्यक्ष सचिन पाटील, लाईन आळी विभागीय अध्यक्ष हरीश पाटील, किरण करावकर, स्वप्नील म्हात्रे आदी जण उपस्थित होते.
कॉंक्रीटीकरणासाठी रस्त्याचे सपाटीकरण, माती भरणी, नदीचा भाग वगळता दोन्ही बाजूला बंद गटार आदी कामांना गती देण्यात आली आहे.काही ठिकाणी 10 मीटरची रुंदी तर काही ठिकाणी आठ मीटरची रुंदी मिळणार आहे, अशी माहिती चौसष्टे यांनी कडू यांना दिली. दोन वर्षापासून काम रखडले होते. पनवेल संघर्ष समितीने पाठपुरावा उत्तमरीत्या केल्याने हे काम होत आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिलखुलासपणे दिली.
पहिल्या सहा महिन्यात एक मार्गिका पूर्ण करून पुढील सहा महिन्यात उर्वरित काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा पावसाळ्यात दुसऱ्या मार्गिकेला खड्डे पडल्यास ते तातडीने बुजून घ्यावेत. अन्यथा काही वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि नागरिकांना मनस्ताप होतो असे कडू यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्याची दक्षता घेतली जाईल असे सांगण्यात आले.
रस्त्याच्या कामात काहीही अडचण आल्यास पनवेल संघर्ष समिती सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे कडू यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.संघर्ष समितीने नेमकं काय केले? राजकीय पक्षांनी फलकबाजी करून श्रेय लाटल्यानंतरही दोन वर्षे उलटली तरी रस्त्याचे काम होत नसल्याने पाहून त्रस्त नागरिकांनी पनवेल संघर्ष समितीकडे कैफियत मांडली होते. त्यानंतर संघर्ष समितीने तातडीने एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक आर. ए. राजीव, उपाध्यक्ष डॉ. के. एच. गोविंदराज, मुख्य अभियंता एल. एस. जोशी, पी. एस. निमजे, लोकेश चौसष्टे आदींची बीकेसी येथील कार्यालयात वारंवार भेट घेवून पाठपुरावा केला होता. गेल्याच महिन्यात डॉ. गोविंदराज यांनी हे काम तातडीने सुरू करण्याची ग्वाही कडू यांना दिली होती, त्याप्रमाणे शब्दाला जागत त्यांनी अखेर कामाला प्रारंभ केला.
