पनवेल प्रतिनिधी-( राज भंडारी ) पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये खारघर येथील अनधिकृत मोबाईल टॉवरचे बांधकाम पनवेल महानगरपालिकेमार्फत उध्वस्त केल्यानंतर आता या मोबाईल टॉवरच्या उभारणीमध्ये असणाऱ्या माफियांनी आपले बस्तान कोणकोणत्या ठिकाणी बसवून जखडून ठेवले आहे, याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा कॉलोनी, कळंबोली, कामोठे, तळोजा, खारघर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत गेली, परिणामी मोकळे भूखंड शिल्लक न राहिल्यामुळे मोबाईल कंपन्यांनी ठरवून दिलेले माफिया मिळेल तिथे आपले काम साधून मोबाईल कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत आपले ध्येय साध्य करीत असतात. मात्र याबाबत भोळ्या भाबड्या सर्वसामान्य नागरिकांना याबाबत यत्किंचित अशी कल्पनाही नसते. किरकोळ स्वरूपाच्या भाडेतत्वावर हे असले टॉवर माफिया आपले काम साधून भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल करीत असतात. त्यामुळे या माफियांनी पनवेल महानगरपालिकेसह राज्यातील तसेच देशातील नागरिकांना आर्थिक अमिश दाखवून त्यांचीही घोर फसवणूक केली आहे.पनवेल महानगरपालिका हद्दीत नुकत्याच समोर आलेल्या घटनेवरून हे मोबाईल टॉवर माफिया प्रशासनासह शासनाची घोर फसवणूक करत आहेत तर गोरगरीब जनतेला तर हातावर गुंडाळण्याचे काम यांनी माथी ठोकूनच बांधले आहे. आज इनामपुरी येथील प्रकरणात मोबाईल टॉवर उद्धवस्त केल्यानंतर पालिकेची जबाबदारी संपली नाही तर अशा माफियांविरोधात भा.दं.वि.कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. मात्र आमचे शासन आवो जावो घर तुम्हारा असे बसले आहे. तात्पुरत्या कारवाया करून कागद रंगवायचे आणि मोकळे व्हायचे. एवढेच आमचे कर्तव्य असल्यासारखे वागत असतात. जोपर्यंत अशा माफियांवर योग्य ती कारवाई होऊन यांना कारागृहाची हवा काय असते हे दाखविले गेले नाही तर पुढे देशातील नागरिकांचे काही खरे नाही असे समजण्याची वेळ यायला वेळ लागणार नाही.