असतं बुवा काहींचं काहीबाही

0

असतं बुवा काहींचं काहीबाही
………………………………
– कांतीलाल कडू
………………………………
आईच्या गर्भातील विलगीकरण केंद्रापेक्षा दुसरं सुरक्षित ठिकाण पृथ्वीतलावरच काय, कुठल्याच ग्रहावर नसेल. मनुष्य जन्माला येण्यापूर्वी तो नऊ महिने नऊ दिवस अज्ञानात सुख म्हणत स्वतंत्ररित्या एकलेपणा अनुभवत असतो. तो जन्माला येतो त्याचक्षणी त्याला असुरक्षिततेची भीती खात असते. ती अगदी मरेपर्यंत. तो कधीच सुरक्षित नसतो. जितका तो आईच्या गर्भात असतो.
कोविड साथीच्या दिवसात आईच्या गर्भाशयातील एकट्याच्याच क्रीडा आठवल्या तरी सुखाचे क्षण मनाला गारवा देवून जातील. कोविडपासून सुरक्षिततेचे कवच तयार करताना माणसाने कोंडमारा करून घेतला आहे. पर्यायही नाही, म्हणावं. पण या कोंडमाऱ्यापेक्षा तो एकांतवास खुप सुखाचा होता. हे क्षण वेदनादायी आहेत. कोविड आहे तरी काय हे गेल्या पाच महिन्यात कळलेला एकही माणूस नाही. त्यामुळे सर्वजण ठोकताळे मांडत असतात. अन इतर, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी असं म्हणत तिचे शेपूट धरून पुढे चालले आहेत.
दूरचित्रवाहिन्यांवर एक हिटची जाहिरात लागायची. अजून असेल बहुधा. मोलकरीण घरात पोचा मारत असते आणि मालकीण तिला घराचे कोपरे साफ करायला सांगते… असा दोघींचा अतिशय कल्पकतेने रंगवलेला संवाद आहे. एक गोष्ट चांगली आहे त्यात ती म्हणजे मोलकरीण सदृढ दाखवली आहे… खात्यापित्या घरची असावी. शिवाय हिंदी सिनेमात श्रीमंत मोलकरीण दाखवतात, तशी अगदी उच्च प्रतीची साडी नेसलेली अशी ती आहे. आवाजही खमकेदार… तो असलास पाहिजे…!
तर ती मावशी म्हणते कोपरा साफ करण्याचे दोन लाख रूपये लागतील… का ते? असे विचारले तर म्हणते की, कोपऱ्यात डास असतात. ते चावले म्हणजे मलेरिया, डेंग्यू होईल… मग ते महागडे उपचार आले. त्यासाठी पैसे लागतील, असा थोडक्यात त्या संवादात दडलेला अर्थ आहे…!
इथे महापालिकेने पाळलेले डास उघड्या, फुटलेल्या आणि सहा महिन्यात दोन वेळा नव्याने बांधलेल्या गटारात राहून वर्षभर रक्त शोषण करतात.
तात्पर्य काय तर डास चावतील म्हणून वाढवून पगार हवा नाही तर कोपरा साफ करणार नाही, अशी ती मावशी चपलखपणे सांगते.
दुसऱ्या एका जाहिरातीमध्ये एक पोलिस इन्स्पेक्टर त्याच्या मुलाला सांगतो की, शहरातील मोठे मोठे गुंड तुझ्या बाबांना घाबरतात… साहजिक मुलाचा चिवट प्रश्न… मग छोटे छोटे डास का नाही घाबरत…? इनकाउंटर स्पेशालिस्टची बोलती बंद… तिसऱ्या एका जाहिरातीमध्ये आजी आणि आजोबांचा फोटो रेखाटणारी सुहास्य वदन असलेली मुलगी दाखवली आहे. तिची आई मग ती नैसर्गिक रित्या बनवलेली अगरबत्ती लावते आणि डास गायब होतात. मुलगी त्या तेवढ्या वेळेत आजी-आजोबांना तिच्या बुद्धीचातुर्याने कागदावर उतरवते. एकही डास न चावल्याने आजी-आजोबा कोलगेटच्या जाहिरातीसारखे चमकदार दात दाखवत हास्य फुलवत असतात. कल्पकता, सृजनशीलता हे जीवनाचे रहस्य मानायला हवे. छान आणि तितकेच रहस्यमयरित्या या तीन जाहिराती वेगवेगळा संदेश, प्रबोधन करून आकर्षित करतात…
आता या जाहिराती आणि कोविडचा संबंध काय असा सहज प्रश्न पडेल!
बघा, पहिल्या जाहिरातीत मोलकरीण भाव खावून जाते. तिला डास चावतील हे माहित असूनही धोका पत्करायला तयार होते. कारण पैसा ही तिची गरज आहे. ती मृत्यूला. घाबरत नाही. तिच्या समोर असलेल्या अडचणी आणि आर्थिक समीकरणे जुळत नाहीत. कोविडवर काहीच विशेष औषधे नाहीत. साध्या तापावरची औषधे दिली जातात. त्यातूनही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आश्चर्यकारक आहे. जेवढी कोविडची व्याप्ती आणि भीती दाखवली जाते त्यातून कोविडचा मृत्यूदर अगदीच कमी आहे. इतर आजार आणि पुन्हा कोविड चाचणीनंतर हॉस्पिटलमध्ये एकट्याचा वनवास सुरू होतो, घरादारापासून दूर राहून मनावर जो आघात होतो त्यातून. घाबरलेले रुग्ण मृत्यूपंथाला घट्ट मिठी मारतात.
एका कोपऱ्याचे दोन लाख ती मागते…. ती महागुरु ठरली आहे. ती अशिक्षित मोलकरीण आजच्या डॉक्टरांसाठी खरंच महागुरु ठरते आहे. पाहा कशी ते…!
खासगी हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर काम करायचे आधीपासून त्यांना दीड ते दोन लाख रूपये पगार मिळतो. मोठे आजार, शस्त्रक्रिया, व्हिजिटिंग हे सिनेमातील पाहुणे कलाकार पद्धतीचे डॉक्टर असतात. त्याप्रमाणे मानधन घेतात.
आता काय झाले… तर कोविड विषाणू इतका भयंकर आहे हे माहीत असताना काही खासगी डॉक्टर उपचार देवू लागले आहेत. पण उपचाराचे बिल पाचशे पट घेऊ लागलेत.. कारण दीड दोन लाख रूपये महिन्याला पगार घेणारे डॉक्टर पाच ते सहा लाख रूपये घेऊ लागलेत. परिचारिका, वॉर्ड बॉय, सुरक्षारक्षक. अगदी, बुरा मत मानो कोविड है म्हणत गळा कापू लागल्याने हॉस्पिटलचे मालक कसायांच्या सुऱ्यापेक्षा धारदार सुरे घेऊन बसले आहेत. त्यामुळे पाचशे रुपयांच्या गोळ्या आणि हॉस्पिटलचे बिल पाच लाख झाले आहे. डॉक्टरांना त्या मोलकरणीसारखे मृत्यूचे भय वाटत नाही. त्यांच्या गरजा काय आणि किती ते त्यांनाच ठावूक. पण पैशाची हाव सुटली आहे.
दुसरी जाहिरात… शहरातील. बडे बडे गुंड घाबरतात…. हे संस्थानिक डॉक्टर. दहा-पंधरा वर्षात राजकीय नेते, भाई, साहेब यांची भलावण करत हात पाय पसरून आहेत. त्यांना चिंता नाही. बोलता बोलता ऑपरेशन करून लाखो रूपये कमावून बसलेत. त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्यात. पण ते कोविडला मात्र घाबरलेले आहेत. त्यामुळे इतक्या लहान विषाणूला कसे घाबरता, याचे उत्तर त्यांच्याकडे नसल्याने त्यांनी टाळेबंदी खऱ्या अर्थाने राबवली आहे.
तिसऱ्या जाहिरातीतील डॉक्टर हे आयुषवाले आहेत. एक तर मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही किंवा वाजली तर पुंगी नाही तर मोडून खाल्ली या प्रकारातील आहेत. त्यांची प्रक्टिस विलगीकरणाचा एक भाग आहे. झटपट रिझर्ल्ट हवा असतो प्रत्येकाला. त्यामुळे त्यांच्याकडील एरव्ही रुग्णांचा ओघ हातच्या बोटावर मोजण्याइतकाच असायचा. कोविडवर लस आली नाही पण आयुषची मात्रा उपयुक्त आहे म्हटल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर टिपोर चांदणं पडलं आहे. त्यामुळे तिसऱ्या जाहिरातीतील आश्वासकता थोड्या फार प्रमाणात त्यांच्याशी जुळते.
आता राहिले सरकारी डॉक्टर. हे कुठल्याच जाहिरातीमध्ये नाहीत. पण सर्वात जास्त रुग्ण बरे करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. तुटपुंज्या पगारात घड्याळाच्या काट्यांसारखा मणक्याचा काटा फिरेपर्यंत ते कोविड सेवा करीत आहेत. ते महानायक आहेत, त्यामुळे त्यांनाही कोविड सोडत नाही. राहिले काही देवदूत. ते खासगी डॉक्टर असले तरी कुणी हातावर काही ठेवो न ठेवो. घेतलेला आरोग्य सेवेचा वसा सांभाळत आहेत. कोविड त्यांची परीक्षा घेत आहे.
हे सगळं वातावरण पाहून डॉक्टर आता झोपेत ओरडतात… कितने आदमी है?
समोरून आवाज येतो…. दीडशे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here