येवला ( प्रतिनिधी-शरद शेजवळ ) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाड्मय मंडळ अमळनेर द्वारा आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २,३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी पूज्य साने गुरुजी नगरी,प्रताप महाविद्यालय,अमळनेर येथे होणार आहे.या संमेलनात दुसऱ्या दिवशी सायंकाळी होणाऱ्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात येवला तालुक्यातील एरंडगाव येथील कवी रतन पिंगट यांना निमंत्रित कवी म्हणून महामंडळाचे नुकतेच आमंत्रण मिळाले आहे.कवी रतन पिंगट हे तालुक्यातीलच शनिमंदिर (पिंपरी) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शेतीमाती, निसर्ग, आणि ग्रामीण बाज असणारा त्यांच्या कविता लेखनाचा विषय आहे. त्यांच्या कविता, कविता रती, कादवा शिवार,व्सासपीठ, तसेच महाराष्ट्रातील अनेक दिवाळी अंक व मासिकातून व वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या आहेत.तसेच अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा सार्वजनिक वाचनालय नाशिकचा “कवी गोविंद” पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट काव्य लेखनाचे कादवा शिवार तसेच शिवाबाबा प्रतिष्ठान यांचेही राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहे. येवला तालुक्यामध्ये नवोदित कवींना प्रोत्साहित करण्यासाठी “शिक्षक साहित्य सांस्कृतिक मंच” चळवळ उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ.रवींद्र शोभणे हे असून उद्घाटक म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुचित्राताई महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना. देवेंद्र फडणवीस व मा.ना.अजितदादा पवार तसेच विशेष अतिथी म्हणून मा.ना.दीपक केसरकर, भाषा शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी ग्रामीण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना. गिरीशभाऊ महाजन यांनी स्वीकारली आहे.कवी रतन पिंगट यांच्या कवी संमेलनातील निमंत्रणाबद्दल येवला तालुक्यातून तसेच नाशिक जिल्ह्यातील साहित्य वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे. गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी सुनील मारवाडी, प्रसिद्ध कवी, गीतकार प्रकाश होळकर,कवी लक्ष्मण बारहाते, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे, मसाप येवला कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड, गिरणा गौरव अध्यक्ष सुरेश पवार, कवी रवींद्र मालुंजकर, नाट्यकलाकार,कवी राजेंद्र उगले, पत्रकार योगेंद्र वाघ,कवी शिवाजी भालेराव, राज शेळके, अरुण इंगळे, बाळासाहेब सोमासे, रवींद्र कांगणे, सुनिल गवळी, मुकुंद ताकाटे,भास्कर नेटारे,बाळासाहेब हिरे, प्रा.शरद शेजवळ,गझलकार सचिन साताळकर, बालकवी शंकर आहिरे तसेच साहित्य परिषद शाखा येवला, शिक्षक साहित्य सांस्कृतिक मंच व समस्त साहित्य वर्तुळातून अभिनंदन होत आहे.