करोनावरील ‘ही’ औषधं मोफत देण्याचा सरकारचा विचार : उद्धव ठाकरे

0

राज्यावर करोनाच्या रुपानं अभूतपूर्व संकट ओढवलं आहे. दिवसेंदिवस राज्यातील करोना बाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे सरकला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात दिवसाला उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर अनेक शहरातून लॉकडाउन करण्यासंदर्भात विचारण होत आहे. तुम्ही अनावश्यक कामासाठी बाहेर पडणं थांबवलं नाही, तर पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

राज्यातील करोना परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “”मी आपल्याला आपुलकीने सांगतो. आता सगळी दुकानं सुरू झाली म्हणून सगळं काही सुरू झालं असं समजू नका. आपणहुन कोरोनाला बळी पडू नका, एकमेकांपासून अंतर ठेवा. मॉर्निग वॉकसाठी परवानगी दिली आहे. ती आरोग्य सुदृढ व्हावं म्हणून दिली आहे. आजाराला बळी पडण्यासीठी दिलेली नाही. लॉकडाउनबद्दल काही शहरांतून विचारणा होत आहे. मग लॉकडाउन करायचा का? मी आपल्याला विचारतोय, लॉकडाउन करण्याचा निर्णय हा तुमच्यावर सोपवणार आहे. गरज नसताना बाहेर पडले व गर्दी केली, केसेस वाढायला लागल्या तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. त्यामुळे काही भागात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर त्या ठिकाणी लॉकडाऊन लागू करावा लागणार आहे. त्याबरोबर परवापासून (१ जुलैपासून) सगळं काही उघडत आहोत. असा गैरसमज करून घेऊ नका,” असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

“कोणत्याही औषधाच्या बाबतीत आपण पाठीमागे नाही आहोत. तुम्ही नाव सांगा ती औषध आपण वापरत आहोत. रेमडेसिवीर, फॅवीपिरावीर या औषधांसाठी मार्च, एप्रिलपासून आपण पाठपुरावा करत होतो. त्याची परवानगी मिळाली. आता रेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा, एचसीक्यू, डॉक्सी ही करोनाची औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करुन देण्याच्या विचारात प्रशासन आहे. पण, त्यासाठी केंद्राची परवानगी आणि औषधांची उपलब्धताही तितकीच महत्त्वाची आहे. रेमडेसीवीरसारखी औषधे राज्य सरकार उपलब्ध करुन देणार, तुटवडा भासू देणार नाही. ही औषधे शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here