करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद असलेल्या सलून चालकांना अखेर दिलासा मिळाला आहे. २८ जूनपासून सलून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे सलून चालकांना फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. थोडे दिवस निरीक्षण केल्यानंतर यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
अनिल परब यांनी निर्णयाबद्दल बोलताना सांगितलं की, “२८ जूनपासून सलून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सलूनमध्ये फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, दाढी करण्यासाठी परवानगी नाही. सोबतच केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. थोडे दिवस पाहणी करुन नंतर पुढील निर्णय घेतला जाईल”.