
मुंबई : (रवींद्र मालुसरे) – २०१४ नंतर टिव्ही आणि मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल मीडियामध्ये मोठया प्रमाणावर जगभर क्रांती झाली आहे, तंत्रज्ञान लाटेसरशी आपल्यावर येत असून त्याच्या भोवऱ्यात आपण सापडलो आहोत. आपल्या एकाच घरात कमालीची द्वेषभावना वाढत असून एका बाजूने आपण तर दुसऱ्या बाजूने कुणीतरी विरोधी बाजू घेऊन अतार्किक बोलत असतो. मनोरंजन हे आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी जरी आवश्यक असले तरी धोक्याची घंटा म्हणून त्याच्याकडे सावधपणे लक्ष द्या कारण हिंसा, द्वेष आणि लैंगिकता पसरवण्याचा तो सोपा धागा आहे. पौंगडावस्थेतील मुलांपेक्षाही लहान मुलांच्या हातात मोबाईल किती द्यायचा, मोबाईल बाजूला ठेवून किमान दोन तास ती मैदानात कशी खेळतील याचा विचार करणे काळाची गरज आहे असे परखड मत नितीन वैद्य यांनी व्यक्त केले.
दादर येथील अमरहिंद मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ७६ व्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘मनोरंजनाची बदलती दुनिया’ या विषयावर त्यांनी विचारपुष्प गुंफत होते. दूरदर्शनपासून जवळजवळ २०१२ पर्यंतचा काळ हा त्यांनी फार जवळून अनुभवला असल्याने त्यांनी याबाबतीत आपले परखड मत मांडले.
टेलिव्हिजन होते तेव्हा घरातील सगळे सदस्य एकत्र बसून कार्यक्रम बघायचे. २०१० नंतर जी डिजिटल क्रांती भारतात आली त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक वेगळा झाला स्वतंत्र झाला आणि त्यामुळे त्याच्या आवडी निवडीदेखील बदलत गेल्या असं नितीनजी यांनी स्पष्ट केलं आहे. या क्रांतिमुळे मोबाईल, स्मार्टफोन, इंटरनेट स्वस्त झालं आणि यामुळेच एकाच घरात एकाच टेलिव्हिजनवर एक कार्यक्रम बघणारी ४ माणसं आता ४ वेगवेगळ्या ठिकाणी बसून आपआपले आवडते कार्यक्रम पाहू लागली आहेत. एकप्रकारे धोक्याची घंटा दारात नसून घरात आली आहे. डिजिटल क्रांतीमध्ये महाराष्ट्र हा नेहमीच पहिल्या नंबरवर होता आणि पुढे येणाऱ्या काळातही महाराष्ट्र त्याचं स्थान अबाधित राखेल अशी आशा असली तरी पिढ्यानपिढ्या संस्कृतीने उदारमताचा जपलेल्या महाराष्ट्र धर्माच्या विचाराला बाधा येणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी.
