कोरोना व्हायरस पूर्णपणे संपणार असे दिसत नाही, याला जीवनाचा भाग म्हणून स्वीकारा -पवार

0

मुंबई. कोरोना व्हायरस विरोधात लढताना या व्हायरसचा लवकरात लवकर पूर्णपणे नायनाट होईल असे दिसत नाही. त्यामुळे, लोकांनी कोरोनाला जीवनाचा भाग म्हणून स्वीकारावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले. कोरोनावर उपाय सूचवताना त्यांनी सरकारला जनजागृती करण्याचे आवाहन केले. सोबतच, लोकांनी देखील वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व समजून घ्यावे. महाराष्ट्राच्या आरोग्य आणि माहिती प्रसारण विभागांनी कोरोना संदर्भात लोकांना जास्तीत-जास्त माहिती द्यावी. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्लॅन तयार करावा आणि जास्तीत-जास्त गुंतवणूकदारांना आकर्षित करावे असेही पवारांनी बुधवारी म्हटले आहे.

शरद पवारांनी मंगळवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेउन कोरोना, लॉकडाउन आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. यात कोरोनामुळे डबघाईला गेलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कसा हातभार लावता येईल यावर मुख्यमंत्र्यांकडे आपले विचार मांडले. पवार बुधवारी बोलताना म्हणाले, “कोरोनाचे लवकरात लवकर समूळ उच्चाटन होईल असे दिसत नाही. त्यामुळे, कोरोना आपल्या आयुष्याचा एक भाग आहे हे स्वीकारावे लागेल. यापासून सावध राहा आणि जास्तीत-जास्त जनजागृती करा. जपानमध्ये लोक मास्क घालतात. स्वतःच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेतात, हा त्यांच्या दिनचर्येचा भाग आहे.” कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनीच मास्कचा वापर करावा. सॅनिटायझर आणि ग्लव्ह्स वापरावे असे आवाहन सुद्धा पवारांनी ट्विट करून केले आहे.

माजी कृषी मंत्री शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, सरकारने राज्यात कुठे आणि कुठल्या प्रकारची सूट दिली जात आहे याची एका ठराविक वेळेवर रोज जनतेला माहिती देत राहावी. अनेक प्रवासी मजूर महाराष्ट्र सोडून गेले आहेत. अशात येथील युवकांना रोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अॅक्शन प्लॅन तयार करावा आणि उद्योगांना कशी मदत करता येईल ते पाहावे. गेल्या काही दिवसांत अविकसित आणि मागास भागांमध्ये विकासाच्या अनेक योजना आखण्यात आल्या होत्या. अशाच प्रकारच्या काही योजना आणून उद्योग क्षेत्राचा विकास केला जाऊ शकतो आणि गुंतवणूकही वाढवली जाऊ शकते. यासोबतच, सरकारने टप्प्या-टप्प्याने सर्वच प्रकारची वाहतूक यंत्रणा सुरळीत करावी. उद्योजकांशी चर्चा करूनही प्लॅन तयार केले जाऊ शकतात. योग्य ती काळजी घेऊन दुकाने आणि उद्योग पुन्हा सुरू केले जाऊ शकतात. यासोबतच, लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध ठिकाणी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यावर भर द्यावा असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here