राज्य आणि केंद्र सरकार धनगर समाजाच्या खंबीरपणे पाठीशी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
राज्य व केंद्र सरकार हे धनगर समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे असे उदगार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी काढले. धनगर समाजाला सरकारच्या वतीने विधीमंडळात सवलतीच्या घोषणा जाहीर करण्यात आल्या होत्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाच्या वतीने ना.देवेंद्र फडणवीस यांचा भव्य दिव्य असा मुंबईत नागरी सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. त्यांचा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने ढोल ताशांच्या गजरात भव्य सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, मधुकर शिंदे हे उपस्थित होते. धनगर समाजाचे नेते आणि विधान परीषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते फेटा बांधून ना. फडणवीस साहेबांचा सन्मान करण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच २२ योजनांची एकत्रिकरण करत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेळी मेंढी सहकार विकास मंडळाची स्थापना करून दहा हजार कोटी रुपयाचे बीनव्याजी कर्ज मेंढपाळांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढी पालनासाठी भरीव निधीची मदत करण्यात येणार आहे. धनगर समाजाला पंचवीस हजार घरे बांधून देण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी यशवंतराव होळकर जोडरस्ते ही तयार करण्यात येणार आहे. अशा अनेक योजनांची माहिती उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी या धनगर समाजाच्या मेळाव्यात दिली. फडणवीस यांच्या सन्मान सोहळ्यास संपूर्ण राज्यातील मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here