अमळनेर प्रतिनिधी–राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात कोरोनाच्या रुग्णांना काहीही कमी पडणार नाही. त्यांच्यावर चांगले उपचार केले जातील. पण आजही अमळनेर शहरातील कोविड सेंटरमध्ये या रुग्णांना पुरेशे जेवन, पाणी, चहा, नाश्ता मिळत नाही. तर दुसरीकडे कोरोनाची साखली वाढतच चालली आहे. अमळनेरात कोरोनाने थैमान घातले आहे. सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या हलगर्जीपणाचे परिणाम अमळनेरकर जनतेला भोगावे लागत आहेत. अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवणे थांबवून ठोस पावले उचलून रुग्णांना सुविधा पुरावाव्यात अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आमदार स्मिताताई वाघ यांनी दिला आहे.
आमदार स्मिताताई वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकाळपासूनच सतत मला फोन सुरू आहेत. आज सकाळीच ११.३० वाजेपर्यंत या रुग्णांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते, चहा पोहचलेला नव्हता. तर काल रात्रीचे जेवनही अपूर्ण पाठवले होते. शेवटचे जेवन रुग्णांना रात्री ११ वाजता पोहोचले. जिल्हाधिकारीही म्हणतात प्रातांना खर्च करण्याचे सर्व अधिकार दिले आहेत, मग कोरोना रुग्णांचे हाल का केले जात आहे, सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अमळनेरातील कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर अमळनेरातील प्रशासकीय यंत्रणेला सजगतेच्या सूचना आल्या असताना त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच कोरोना हा अमळनेरकरांच्या मानगुटीवर बसून नाचतो आहे. तालुक्यातील मुंगसे येथील महिला पॉझिटीव्ह आल्याने यंत्रणा थोडीफार हालली. पण त्यापासून सावधगिरीचा धडा घेता आला नाही. आज पूर्ण जिल्ह्यात दीडशेवर कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक शंभर रुग्ण हे अमळनेर शहरातीलच आहेत.
साळीवाड्यातील महिलेचा मृतदेह का ताब्यात दिला
कोरोनाचा शिरकाव झाल्याबरोबर तालुक्यातील रस्ते बंद करा, रस्ते तोडा अशा सूचना आपण दिल्या होत्या. साळीवाड्यातील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह प्रशासनाने ताब्यात दिल्यानेच हे सर्व घडून येत आहे. या मागे प्रशासनाचा आणि अधिकाऱ्यांचा काय उद्देश होता, याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे. साप निघून गेल्यावर त्याच्या घिसंडीला काठ्या मारण्याचा प्रकार अधिकार्यांनी सुरू केल्याने हा कोरोनाचा अजगर आज संपूर्ण अमळनेर शहराला गिळंकृत करण्यासाठी आवासून उभा आहे.
लॉकडाऊन सुरू असतानाही दारूचा महापूर वाहत आहे. म्हणूनच जिल्ह्यास्तरावरून हालचाली सुरू झाल्याने शहरातील दारू दुकानांची तपासणी झाली. त्यात १५ दुकानांवर गुन्हा दाखल झाला. म्हणूनच लॉकडाऊन असताना गावठी दारूसह देशी विदेशी मद्य व गुटखा आला कुठून हा प्रश्न पडतो ? कोणाचा वरदहस्त आहे ?
हे कोण्या जोतिषाने सांगण्याची गरज उरली नाही. चमकोगिरीच्या बातम्या आल्या म्हणजे खूप मोठे काम केले अशा भ्रमात राहणे योग्य आहे का ?
पॉझिटीव्ह रुग्ण आणि क्वारंटाईन झालेल्यांचे हाल
शहरात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पण त्यांना ठेवण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये पुरेशी पाण्याची सोय नाही, त्यांना भोजन व्यवस्थित दिले जात नाही. केवळ शिवभोजनालयावर त्यांचे भागवले जात आहे. या रुग्णांचा स्वयंपाक करण्यास कोणी तयार नाही, त्यांच्याजवळ जायायला सर्व अधिकारी घाबराताय, मग त्यांना मरू द्यायचे आहे का, अधिकारी कधी तेथे व्हिजिट करीत नाही. त्यामुळे या रुग्णांचे आणि क्वारंटाईन झालेल्यांना नरकता आल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यापेक्षा कोरोना होऊन मेलेले बरे अशी म्हणण्याची वेळ क्वारंटाईन झालेल्यांवर आली आहे. त्यांचे कौन्सिलिंग करण्यासाठी प्रशासन काहीच करीत नाही. सरकार म्हणते सर्व सुविधा देऊ, प्रशासन पुरेशा सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे.
कोविड सेंटरला पोहचण्यासाठी अधिकारी का घाबरताय…
शहरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. कोणाच्या चुका होताय याचा प्रशासन अजूनही गांभीर्याने विचार करताना दिसत नाही, प्रतिबंध क्षेत्र तोडून कोरोना बाहेर कसा पडला, याला जबाबदर कोण आहे, याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई होणेही गरजेचे आहे. कन्टेमेंट झोनमध्ये अनेक रुग्ण आढळत आहेत. याला जबाबदर कोण आहे. या रुग्णांची प्रॉपर हिस्ट्री शोधली जात नाही का कोविड सेंटरला पोहचण्यासाठी अधिकारी घाबरतात मग या रुग्णांकडे कोण लक्ष देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.