मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला

0

पुणे: पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळा आज (शनिवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित मोठ्या उत्साहात पार पडला. साखर उत्पादनात वेगळे प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या संस्थेत ऊस पिकाचे उत्पादन वाढून त्याचे लागवड क्षेत्र वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. या संस्थेची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे काम आदरणीय शरद पवार यांनी केले असल्याचे मत याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.देशातील कृषी प्रक्रिया उद्योगात राज्यातील ऊस उत्पादनाचा क्रमांक वरचा आहे, त्यामुळे जगात देखील महाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र काळाची गरज म्हणून आता उसापासून साखरेसोबत इथेनॉल निर्मिती देखील राज्यातील साखर उद्योगांनी सुरू केली असून १०६ साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करत आहेत. भविष्यात ही संख्या अधिक वाढेल अशी अपेक्षा यासमयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.कोरोना काळात साखर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. कोविड सेंटर करिता जागा उपलब्ध करून देत सॅनिटायझर निर्मितीसाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला, सांगली-कोल्हापूर येथील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुराच्या समयी देखील त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली हे निश्चितच कौतुकास्पद होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कृषी विज्ञान तंत्रज्ञान, ऊस लागवड, जमिनीची सुपीकता, नवीन वाणांची निर्मिती यासाठी काम केले जात आहे. हा उद्योग वाढावा आणि टिकावा यासाठी शासन देखील नक्कीच प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना दिली.राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात १८ सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आले असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत हे अधोरेखित करत एनडीआरएफचे निकष बदलून मदत करणे तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला असल्याचे नमूद केले. जलयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी शासन पुढाकार घेणार असून राज्यातील शेतकऱ्यांना ९०० हारवेस्टर घेण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी घोषणा यासमयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार साहेब, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त व विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आणि विश्वस्त जयंत पाटील, संचालक मंडळाचे सदस्य हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, सतेज पाटील, दिलीप देशमुख, विशाल पाटील आणि साखर महासंघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य पदाधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here