जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तुरंबव मधील अभय भुवड याची गगनभरारी, जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र ने केले अभयचे कौतुक..!

0

चिपळूण-प्रतिनिधी महेश्वर तेटांबे
जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्याच्या अंतिम निवडीसाठी चिपळूण तालुक्यातून तुरंबव  शाळेतील अभय भुवड ,कु.गायत्री म्हसकर ,कु.अंकिता गोरे हे दहापैकी तीन विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यातील अभय भुवड हा अमेरिकेत नासा व बंगळूर इस्रो याठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी पात्र ठरला .यांचा कौतुक सोहळा जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र,बदलापूर मुंबई या संस्थेने पार पडला .यावेळी विद्यार्थ्यांचे आई वडील यांनाही सन्मानित करण्यात आले .जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि संशोधक वृत्ती जागृत व्हावी यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्तीकुमार पूजार यांच्या प्रेरणेतून गगनभरारी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गगनभरारी उपक्रम राबवत आहे . अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. परीक्षित यादव, शिक्षणाधिकारी मा.वामन जगदाळे व उपशिक्षणाधिकारी मा.मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.नासा या अमेरिकन आणि इस्त्रो या भारतीय अंतराळ संस्थाची सैर घडवून आणली जाणार आहे.यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद नेटके ,श्री दिलीप उपरे ,श्री प्रशांत पाष्टे ,श्री विशाल मगर यांचे मार्गदर्शन लाभले, विद्यार्थ्यांचे कौतुक करत असताना जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री गुरुनाथ तिरपणकर म्हणाले “आज या शिक्षकांनी विज्ञानाच्या संकल्पना समजावून त्यामागील विज्ञाननिष्ठा रुजवली आहे . म्हणून शिक्षक हा मुळातच संवेदनशील हवा.उपलब्ध झालेल्या सुवर्णसंधीचा अचूक फायदा घेता यावा यासाठी शिक्षकांनी अपार मेहनत व योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवला. या शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जीवन चैतन्याचे बळ देणारा आहे. तालुका स्तरावर निवड झाल्यावर  यांना अधिक परीपूर्ण करण्यासाठी या शिक्षकांनी  घेतलेले चौकटी बाहेरील परिश्रम विद्यार्थ्यांना गगन भरारी घेण्यासाठी सशक्त करणारे आहेत”. या कौतुक सोहळ्यासाठी जनजागृती सेवा समितीचे खजिनदार श्री दत्ता काडूलकर,सौ तिरपणकर वहिनी, नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष मा.रमजान गोलंदाज ,जिल्हा परिषद आदर्श शिक्षक श्री अरविंद भंडारी ,वहाळ बीटचे बीट मुख्याध्यापक श्री विकास महाडिक, श्री सुधीर जाबरे, श्री पर्शराम देवरुखकर, शाळाव्यस्थापन समिती अध्यक्षा सौ सलोनीताई पंडित ,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शरद नेटके सर व शाळेचा सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. यानिमित्ताने विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरुपाचे दिसून आले. या हिऱ्यांना पैलू पडत  असताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार,  नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी, मुलाखतीसाठी अपेक्षित आत्मविश्वास यांची सुंदर नक्षी उमटण्याचा अनुभव प्रेरणा देणारा आहे. यातूनच उद्याचे आदर्श वैज्ञानिक, संशोधक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जोपासून विद्यार्थ्यांमधील प्रकट सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार देण्याचा अल्प कालावधीत केलेला प्रयत्न नक्कीच पुढील जीवनासाठी मार्गदर्शक ठरेल. स्पर्धा विषयाच्या अनुषंगाने नवनवीन ज्ञान मिळवून, विभिन्न शैक्षणिक साहित्याचा अवलंब करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवणाऱ्या या शिक्षकांनी उमलत्या कळ्यांमध्ये आंतरिक शक्तींचा स्फुल्लिंग चेतविले आहे. आजचे युग हे संगणकाचे, विज्ञानाचे युग आहे. परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा खरे ज्ञानाकांक्षी, विवेकनिष्ठ प्रयोगवीर तयार करण्यासाठी या शिक्षकांनी आपल्या वाट्याला आलेले काम कुशलतेने, आनंदीवृत्तीने, बिनचुकपणे, वेळेत केले आहे. त्याचे फलित यश रूपाने झाली आहे . चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभयच्या या गगनभरारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here