मुंबई. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार 506 झाली आहे. शुक्रवारी एका दिवसात सर्वाधिक 1008 रुग्णांची वाढ झाली. याशिवाय काल दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यभरात आतापर्यंत 1 हजार 879 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 9 हजार 148 कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान आज (3 मे) नांदेडमध्ये एकाच दिवसात 26 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
राज्यात आतापर्यंत 485 मृत्यू
राज्यात आतापर्यंत 485 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यात मुंबई आणि उपनगरात 320, पुणे डिवीजन 107, नाशिक डिवीजन 30, कोल्हापूर डिवीजन 3, औरंगाबाद डिवीजन 9, लातूर डिवीजन 2, अकोला डिवीजन 9 आणि नागपूर डिवीजनमध्ये 2 मृत्यू झाले आहेत याशिवाय राज्याच्या बाहेर तिघांचा मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्ये गुरुद्वार परिसरात संचारबंदी लागू
नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्यामुळे गुरुद्वार परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेडमधील गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात राहणाऱ्या 97 लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते त्यामधील 20 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामधील 25 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 11 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. या सर्वांना एनआरआय भवन कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात पुर्वीचे 6 रूग्ण आणि नव्याने आढळून आलेले 20 रूग्ण असे एकूण 26 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.
अकोल्यात खासगी रुग्णालयातील डॉक्टरला कोरोनाची लागण
अकोला शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. शुक्रवारी 1 मे रोजी ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर शनिवारी 2 मे रोजी पुन्हा 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एक खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या 38 वर पोहोचली आहे. त्यातील 22 रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत.
चंद्रपुरात एक हजार प्रवासी उतरले रस्त्यावर
चंद्रपुरात शनिवारी एक हजार परप्रांतीय कामगारांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. आम्हाला घरी जाण्याची परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे, सरकारने सूचित केले की मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक सारख्या रेड झोनच्या या भागात लॉकडाऊनमध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. तसेच पुणे व मुंबईहून प्रवासी आणि मजुरांना घरी परतण्यासाठी कोणतीही गाड्या धावणार नाहीत.
पुण्यात कोरोना रुग्ण मृत्यूचा आकडा 100 वर
पुण्यात कोरोनाचा हाहाःकार सुरूच आहे. जिल्ह्यात काल (1 मे) 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1815 झाली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात काल 24 तासात 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 100 वर पोहोचला आहे. तर 52 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 239 वर
औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी सकाळी आणखी 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यासोबत शहरातली कोरोनाबाधितांचा आकडा 238 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 25 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
जालन्यात एसआरपीएफच्या 4 जवानांना कोरोना
जालन्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळले. यामध्ये 4 एसआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. हे जवान मालेगावहून परतले होते. तर आतापर्यंत दोन रुग्ण बरे झाले आहेत. जालना जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतांनाच शुक्रवारी रात्री उशिरा परजिल्ह्यातून जालन्यात आलेल्या पाच संशयित रुग्णांचे अहवाल प्रयोग शाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे जालना शहरासह जिल्ह्यातील जनतेत एकच खळबळ उडाली आहे.