महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या घरगुती पाईपद्वारे गॅस पुरवठ्याचा कुडाळमध्ये प्रारंभ, राजन बोभाटे यांच्या घरी आला पहिला पाईपमधून गॅस

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कुडाळ (सिंधुदुर्ग) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठ्याचे स्वप्न आता साकार झाले आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे डोळे लागलेल्या हितकारी व बहुप्रतिक्षित अशा घरगुती वापरासाठीच्या पाईपद्वारे नैसर्गिक वायूच्या (पाईप्ड नॅचरल गॅस) पुरवठ्याचा आज महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या शहरी वायू वितरण कंपनीतर्फे कुडाळमध्ये प्रारंभ करण्यात आला.घराघरांतून पाईपद्वारे गॅस उपलब्ध होण्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या योजनेमध्ये कुडाळ हे पहिले शहर ठरले असून शहरातील श्री. राजन बोभाटे हे या योजनेचे पहिले ग्राहक झाले. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीतर्फे श्री. राजन बोभाटे यांच्या कुडाळमधील लक्ष्मीवाडी येथील घरी पाईपद्वारे गॅस वितरणाची सुरवात कंपनीचे संचालक (वाणिज्य) श्री. संजय शर्मा यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे अधिकारी, ग्राहक श्री. राजन बोभाटे व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीतर्फे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घराघरांतून पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा करण्याच्या उद्देशाने युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले होते. ठराविक मुदतीत काम पूर्ण करून सिंधुदुर्गवासीयांच्या घरांमध्ये लवकरात लवकर नैसर्गिक वायू पाईपद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी कटीबद्ध होती व आज ते काम तडीस जात असल्याचे समाधान आहे, असे कंपनीचे संचालक श्री संजय शर्मा याप्रसंगी म्हणाले.पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा ही अतिशय आव्हानात्मक प्रक्रिया असली तरी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापनाने, अभियंत्यांनी व कर्मचाऱ्यांनी जमीन अधिग्रहणापासून ते पाईप्स बसविण्यासाठीच्या खुदाई ते प्रत्यक्ष वायू वाहून आणण्यापर्यंतचे हे काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केले. यासाठीची ‘डिस्ट्रीब्युशन कंट्रोल सिस्टीम’ कार्यान्वित करणे, सरकारी परवानग्या घेणे व प्रत्यक्ष बांधकाम करणे इत्यादी कामे कंपनीने विक्रमी वेळेत पूर्ण केली. जमीन नोंदणीपासून चाळीस दिवसांच्या आत कामे सुरू झाली. दरम्यानच्या कोरोनाकाळातही हे काम अखंडित चालू राहिले. या सर्व नियोजनामुळेच आज वायू पुरवठा सुरळीतपणे चालू होऊ शकला असे ते पुढे म्हणाले.कुडाळबरोबरच कणकवली, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले, वैभववाडी, देवगड या तालुक्यातील अन्य भागात सुद्धा ही योजना लवकरच कार्यान्वित होईल असेही ते म्हणाले.नजीकच्या काळात कुडाळमध्ये सुमारे 1300 इतक्या लाभधारकांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा होईल. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5100 इतक्या डोमेस्टिक कनेक्शन जोडण्याचे उद्दीष्ट ठेवले असून लवकरच अन्य शहरांतही नियमित वायू पुरवठा चालू होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठ्याचा जिल्ह्यातील ग्राहकांना तिहेरी फायदा होणार आहे. थेट घरांमध्ये घरगुती वापराचा गॅस उपलब्ध झाल्याने सिलेंडर्ससाठी नंबर लावण्याचे कष्ट वाचणार आहेत. नळीद्वारे मिळणारा गॅस हा एलपीजी सिंलेडर्सच्या प्रचलित किंमतींच्या तुलनेत स्वस्त (approx. by 8%) असल्याने किंमतीत बचत होणार आहे. याबरोबरच, हा गॅस शुद्ध व हरित स्वरूपात असल्याने पर्यावरणपूरक तसेच वापरास सुरक्षित आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात उपलब्ध असलेली थेट घरात पाईपद्वारे मिळणारा गॅस आपल्या जिल्ह्यातही उपलब्ध झाल्याने येथील लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व गेल इंडिया लिमिटेड या दोन महारत्न सरकारी कंपन्यांचा संयुक्त उपक्रमआहे. यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडमार्फत महाराष्ट्र सरकारचा सहसमभाग आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह हिंजवडी, चाकण आणि तळेगाव, वलसाड (आधी अधिकृत क्षेत्र वगळता) तसेच महाराष्ट्रातील धुळे, नाशिक जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि कर्नाटकातील रामनगर इत्यादी भौगोलिक भागात ही एक प्रमुख शहर गॅस वितरण करणारी कंपनी आहे. कंपनीला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून बुलढाणा,नांदेड, परभणी या जिल्ह्यांबरोबर निजामाबाद, आदिलाबाद, निर्मल, मंचेरील, कुमुराम, भीम, आसिफाबाद, कामारेड्डी (तेलंगणा) या जिल्ह्यांमध्येही शहर गॅस वितरण जाळे विकसित करण्यासाठी अधिकृतता प्राप्त झाली आहे. सन 2006 मध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड स्थापन झाली असून सर्वात नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मार्गाने सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोत प्रदान करण्यात आजपर्यंत कंपनीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here