नांदूरच्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा तब्बल २३ वर्षानंतर भरला वर्ग

0

नाशिक : नांदूर येथील संत जनार्दन स्वामी मनपा शाळा क्र. ८० मध्ये इ. ७ वीत शिकणाऱ्या व १९९९ मध्ये मनपा माध्यमिक विद्यालय नांदूर येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा तब्बल २३ वर्षांनंतर रामसिता लाॅन्स येथे शालेय वर्ग भरला. यावेळी रामसिता लाॅन्सवर खास शालेय वर्गाची प्रतिकृती करण्यात आली होती. बॅनररुपी फलकावर पट, हजर, गैरहजर व तत्कालीन आठवणींचे फोटो छापण्यात आले होते.
सकाळी ठिक ११.३० वाजता तत्कालीन शिक्षक बाळासाहेब सातपुते, सोमनाथ माळोदे, राजेंद्र ढेपले, संजय सोनवणे, सुनंदा जाधव, प्रतिभा देवरे यांचा प्रतिकात्मक वर्गात प्रवेश होताच सर्व विद्यार्थ्यांनी जागेवर उभे राहत टाळ्यांच्या गजरात आपल्या गुरुवर्यांचे स्वागत करत आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला.
स्नेहमेळाव्याचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे सर्वांचे अतिशय लाडके व शिस्तप्रिय तत्कालीन शिक्षक बाळासाहेब सातपुते यांनी भूषविले. अध्यक्ष बाळासाहेब सातपुते सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करुन स्नेहमेळाव्यास सुरुवात करण्यात आली. प्रथमतः उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांनी सध्या करत असलेले व्यवसाय सांगत आपापली ओळख करुन दिली. ओळख करुन देत असताना आपल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याचे समाधान मात्र उपस्थित शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांतून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिस्त, संस्कार यामुळेच आज आंम्ही चांगली प्रगती करु शकलो तसेच तत्कालीन शिक्षकांच्या आठवणी सांगत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तद्नंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षकांसमवेत संगीतखुर्ची खेळत खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच शालेय जीवनातील स्नेहसंमेलनातील गीते, कव्वाली, विनोद सादर करत आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्षीय मनोगतात बाळासाहेब सातपुते सर यांनी या विद्यार्थ्यांची दहावीची पहिलीच बॅच असल्याचे सांगत या माध्यमिक शाळेची सुरुवात हि तत्कालीन प्राथमिक शाळेचा पालक- शिक्षक संघ व शिक्षक यांच्या प्रयत्नाने कशी झाली याचा इतिहास सांगत जीवनात शिस्त, संस्कार यांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन केले. तर माध्यमिक शिक्षक सोमनाथ माळोदे, राजेंद्र ढेपले, संजय सोनवणे, सुनंदा जाधव, प्रतिभा देवरे यांनी अतिशय तुटपुंजा पगार असतानाही या विद्यार्थ्यांना अतिशय तळमळीने शिकवल्याचे प्रतिपादन करत आज मात्र या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीने कृतार्थ झाल्यासारखे वाटते असे सांगितले. या स्नेहमेळाव्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी नवनाथ निमसे, बुद्धिसागर बागूल, जगन पगार, सविता माळोदे, ज्योती दिंडे यांनी परीश्रम घेतले. तर मेळाव्यास रवी निमसे, मच्छिंद्र निमसे, रोशन जगताप, भाऊसाहेब चव्हाण, नवनाथ माळोदे, लक्ष्मण पगार, कैलास कुंदे, आरती माळोदे, वनिता निमसे, मंदा ढगे, सुनिता पवार, आरती पगार, रेखा सोनवणे, सुरेखा दिंडे, मधुरा मुसळे, सुमन माळोदे, ज्योती माळोदे, सुनिता निमसे, माधुरी मोरे, रेश्मा सातपुते, सविता शिंदे, अनिता दिंडे, मिनाक्षी माळोदे, नंदू चवळे, जनार्दन मगर, रविंद्र मगर, नवनाथ मगर, अनिल निमसे, किसन दिंडे, दत्तू निमसे, एकनाथ हांबरे, भाऊसाहेब शिंदे, रविंद्र बोराडे, राजू जगताप इ. वर्गमित्र उपस्थित होते.मेळाव्याचे सूत्रसंचलन किर्ती खैरनार, स्वागत भाऊसाहेब चव्हाण तर आभारप्रदर्शन जगन पगार यांनी केले. शेवटी सर्व वर्गमित्र व उपस्थित शिक्षकांनी एकत्र स्नेहभोजन घेऊन या स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here