
सिल्लोड ( प्रतिनिधी/ विनोद हिंगमिरे ) सिल्लोड तालुक्यातील भराडी या गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वडोद चाथा या गावी देवी जगदंबेचे प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. मंदिर पश्चिमाभिमिखी असून अत्यंत जाज्वल्य व नवसाला पावणारी देवी म्हणून जगदंबेची ख्याती सर्वदूर आहे. येथे शक्तीच्या समोरच शिवाचं मंदिर आहे. हेमाडपंती बांधणीचे हे मंदिर जगदंबेच्या मंदिराच्या समकालीन असावे मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंड असून द्वारशाखेवर देवी देवतांचे शिल्प कोरलेले आहेत. डाव्या व उजव्या बाजूला देवळीत गणरायाची शस्त्रधारी शिल्प आहे. जगदंबा मातेच्या मंदिरात काही नव्याने बांधकाम करण्यात आले असून सभा मंडपा समोर दोन दीपमाळ व प्राचीन भक्कम कोरीव खांब शिल्पकलेची साक्षी देतात. देवीचे मंदिर जमिनीत खोलतळाशी आहे देवीच्या दर्शनासाठी जाताना असलेल्या छोटे खाणी दारातवर नऊ ग्रहांच्या व गाभाऱ्यात विविध देवदेवतांच्या मूर्ती मनमोहक आहेत. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. देवी व्याघ्रावर स्थानापन्न असून माहूरच्या रेणुका देवीचे ठाणे असल्याची अख्यायिका सांगितली जाते. देवीच्या संदर्भात दुसऱ्या काही अख्यायिका प्रचलित असून भूतलावरील अन्यायी महिषासुराशी सतत नऊ दिवस सिद्ध करून त्याचा वध केल्यानंतर विश्रांतीसाठी या ठिकाणी देवी आल्याचे सांगतात त्यामुळे ही देवी अत्यंत कडक असून तसा अनुभव आल्याचे भक्तगण मानतात.काहीजण हे मंदिर विदर्भातील कौंडीन्यपुरच्या मंदिराची प्रतिकृती असल्याचेही सांगतात.तर अनेकांच्या मते वडोद चाथा हे गाव मुळ विदर्भाशी जोडलेले होते व याचेच नाव हे कौंडीण्यपूर असून याच परिसरात श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केल्याची दुसरी अख्यायिका सांगितली जाते या ठिकाणी मंदिर बांधकामाप्रसंगीत खोलताळाची भिंतीत देवीची प्रतिष्ठापना केल्याचे वैशिष्ट्यही तसेच पाहायला मिळते. तसेच देवीच्या उजव्या हाताला नंददिप असून त्याची दिशा दक्षिणेला असल्याची दुसरे वैशिष्ट्य ही पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीच्या डोक्यावर विघ्नहर्ता गणपती विराजमान आहेत. मंदिराच्या मागील बाजूस दोन नद्यांचा संगम असून येथे एकेकाळी सतत नदीच्या पात्रात तीन दिवस स्त्रिने अंघोळ केल्यास तिला अपत्यप्राप्ती होत असल्याचे बोलले जाते.नवरात्रीच्या काळात परिसरातील भाविक भल्या पहाटे दर्शनासाठी गर्दी करतात. व्यवसाय नोकरी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आवर्जून दर्शनाला येतात.अष्टमिला रात्रभर होम हवन होऊन नवमीला पूर्णाहूती होते. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी भव्य कळसाची उभारणी केल्याने मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.भक्तांच्या दुःखाचे हरण करणारी माता म्हणून जगदंबेचे नाव लौकिक व सर्वदूर आहेत. मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण असून सध्या नवरात्र उत्सवानिमित्त विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा परिसर नऊ दिवस भक्तांनी गजबजुन राहणार आहे.
